मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 22:31 IST2019-06-18T22:27:29+5:302019-06-18T22:31:28+5:30
लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या एईएस आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका
मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ जून रोजी होणार आहे.
दरम्यान, बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने एवढे थैमान घातले असताना मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल 18 दिवसांनी भेट देण्यास पोहोचल्याने बाहेरील नागरिकांनी जोरदार विरोध केला. हॉस्पिटलमध्ये मेंदुज्वराने आजारी मुलांवर नीट उपचार करण्यात येत नाहीत. रोज मुलांचा मृत्यू होत आहे. नितीश कुमार यांना आता जाग आली आहे. त्यांनी परत जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णाच्या एका नातेवाईकाने दिली . नितीशकुमार 18 दिवस उलटले तरीही मुजफ्फरपूरच्या दौऱ्यावर न आल्याने यापूर्वी विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले होते. तसेच काळे झेंडे दाखवत चले जावचे नारे दिले गेले.
मेंदू ज्वराने मुलांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तरीही मुख्यमंत्री नितीशकुमार न आल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. यामुळे मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढविली होती. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जास्त त्रास सहन करावा लागला. मुलांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुळे देशभरात हाहाकार माजला आहे.