VIDEO: कायदा सुव्यवस्था वेशीवर; हाकेच्या अंतरावर हत्या झाली अन् पोलीस काढत होते झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:00 IST2025-03-27T14:51:12+5:302025-03-27T15:00:22+5:30
गुजरातमध्ये हत्या होत असताना पोलीस झोपा काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO: कायदा सुव्यवस्था वेशीवर; हाकेच्या अंतरावर हत्या झाली अन् पोलीस काढत होते झोप
Gujarat Police: गुजरातपोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे उडवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोलिसांवर एका हत्येच्या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. खून झालेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर गुजरात पोलीस खाट टाकून झोपा काढत होते असा आरोप करण्यात येत आहे. जवळच एका व्यक्तीची हत्या झाल्याची पोलिसांना जराही कल्पना नव्हती. हा सगळा प्रकार घडला तेव्हा पोलीस झोपा काढत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे.
अहमदाबादमध्ये सोमवारी रात्री दोन तरुणांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी काही अंतरावरच पोलिसांचे पीसीआर वाहन उभे होते. यावेळी पीसीआरसोबत तैनात असलेले पोलीस अधिकारी खाटेवर आरामात झोपले होते. झोपलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली आहे.
२४ मार्चच्या रात्री अहमदाबादमधील कर्णावती अपार्टमेंटजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी विजय आणि प्रियेश या तरुणांवर हल्ला केला. दोघेही नरोरा गावचे रहिवासी आहेत. हल्ला झाला त्यावेळी दोघेही तिथे बसले होते. तिथून जाणाऱ्या सहा जणांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांनी जाब विचारला असता त्यांनी हुज्जत घातली. वाद इतका वाढला की जयसिंग सोलंकी नावाच्या आरोपीने विजयच्या छातीत वार केले. प्रियेशने विजयला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावरही वार करण्यात आले.
या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. आरडाओरडा पाहून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर पीसीआर वाहन उभे होते. स्थानिकांनी तिथे जाऊन पाहिले तर पोलीस झोपा काढत होते. काही अंतरावरच एवढा मोठा गुन्हा घडला याची त्यांना जराही कल्पना नव्हती.
अहमदाबाद के बापूनगर इलाके में कल रात एक मर्डर हो गया.
— Pratik Inamdar (@Pr_tik_official) March 25, 2025
पुलिस की वान वहां थोड़ी दूर ही खड़ी थी पर पुलिस सो रही थी..!
किन्नरों ने आ कर पुलिस को जगाया तब इनकी सुबह हुई..!
ये गुजरात की कानून व्यवस्था..!#ResignHarshSanghavi#Gujaratpic.twitter.com/mlzWAbtieO
त्यानंतर स्थानिकांना त्यांना उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. यावेळी काही जणांनी पोलिसांचा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये पोलीस झोपेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगितले. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात चाकूहल्ला करणाऱ्या दोघांचा समावेश आहे.