मुंबई महापालिका स्वबळावर की आघाडीद्वारे: काँग्रेसचा निर्णय ७ जुलैला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:45 IST2025-07-01T09:43:32+5:302025-07-01T09:45:28+5:30
या राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

मुंबई महापालिका स्वबळावर की आघाडीद्वारे: काँग्रेसचा निर्णय ७ जुलैला
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर की आघाडी करून निवडणूक लढवायची, याचा अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष येत्या ७ जुलै रोजी घेणार असल्याची घोषणा त्या पक्षाचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी व पक्ष सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी केली. या राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले.
या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार रजनी पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चेची तपशीलवार माहिती दिली. चेन्नीथला यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यात काँग्रेसच्या भविष्यातील रणनीतीवर, तसेच पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक महिन्याला अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये राज्यातील वरिष्ठ नेते सहभागी होऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बैठकीत आपले विचार मांडले. मागील विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचा दावाही या नेत्यांनी केला.
चेन्नीथला यांनी म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची राजकीय व्यवहार समिती ७ जुलै रोजी मुंबईत बैठक घेणार असून, त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर की आघाडी करून लढवायची यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. लवकरच एक ‘चिंतन शिबिर’ही घेतले जाईल.
‘राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका चुकीची’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात भूमिका मांडली होती, अशी आठवण करून देताच रमेश चेन्नीथला म्हणाले की, उत्तर भारतीयांना मुंबईतून हाकलण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची महाराष्ट्राबाबतची बैठक संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चालली. त्यात विविध नेत्यांनी निवडणुकांबाबत विचार मांडले.