दिलासादायक! अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 10:01 IST2020-10-04T09:49:25+5:302020-10-04T10:01:39+5:30
MRI Scan At ₹ 50: अवघ्या 50 रुपयांत एमआरआय करून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे गरजू लोकांना मोठा फायदा होणार आहे.

दिलासादायक! अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये
नवी दिल्ली - देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान अनेक लोक विविध आजारांचा देखील सामना करत आहेत. मात्र काही वेळा वैद्यकीय उपचारांसाठी येणारा खर्च हा जास्त असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता सर्वसामान्यांना याबाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये अवघ्या 50 रुपयांत एमआरआय (MRI) करून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे गरजू लोकांना मोठा फायदा होणार आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने (DSGMC) दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात "स्वस्त" निदान सुविधा ही डिसेंबरमध्ये गुरुद्वारा बंगला साहिब येथे सुरू होणार असून एमआरआयसाठी लोकांना फक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुद्वारा परिसरातील गुरू हरकिशन रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यापासून त्याचं काम सुरू होईल.
गरजूंना केवळ 50 रुपयांमध्ये मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) सेवा उपलब्ध
डीएसजीएमसीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी डालिसिस प्रक्रियेसाठी रुग्णांना 600 रुपये मोजावे लागतील अशी माहिती दिली आहे. रुग्णालयाला 6 कोटींचं डायग्नोस्टिक मशीन दान करण्यात आले आहे. यामध्ये डायलिसिससाठी चार मशीन आणि अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि एमआरआयसाठी प्रत्येकी एका मशीनचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गरजूंना केवळ 50 रुपयांमध्ये मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) सेवा उपलब्ध असणार आहे. तर इतरांसाठी एमआरआय स्कॅनची किंमत 800 रुपये असणार आहे.
एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड फक्त 150 रुपये
कोणाला सवलतीची गरज आहे हे ठरवण्यासाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सिरसा यांनी दिली आहे. खासगी लॅबमध्ये सध्या एमआरआयची किंमत 2,500 रुपये आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड फक्त 150 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या मशीन्स बसवण्यात येत आहेत आणि हे केंद्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. देशातील सर्वात स्वस्त सेवा असेल असं देखील सिरसा यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.