शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, शाळेवर कारवाईची खासदार विशाल पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:44 IST2025-12-05T16:42:42+5:302025-12-05T16:44:53+5:30
'आरटीई पद्धत नको असलेल्या शाळा अशा २५ टक्के मुलांचा छळ करतात. त्यामुळे अशा शाळांची चौकशी करावी'

शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, शाळेवर कारवाईची खासदार विशाल पाटील यांची मागणी
सांगली : खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील प्रदीप पाटील यांचा मुलगा शौर्य पाटील याने दिल्लीच्या शाळेतील शिक्षकांच्या छळास कंटाळून आत्महत्या केली होती. याचे पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. खासदार विशाल पाटील यांनी याप्रकरणी शाळेच्या चौकशीची मागणी केली.
विशाल पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची बाब त्यांनी शासकीय आकडेवारीद्वारे मांडली. ते म्हणाले, शौर्य पाटील याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे शाळेची चौकशी करावी.
वाचा- शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी १२ मार्चला होणार
खासगी शाळेतील २५ टक्के जागा या आरटीई कायद्यानुसार भरल्या जातात. ही पद्धत नको असलेल्या शाळा अशा २५ टक्के मुलांचा छळ करतात. त्यामुळे अशा शाळांची चौकशी करावी. कुणी अशा मुलांचा पुन्हा छळ करू नये म्हणून कायदा कडक करावा. शौर्य पाटील हा माझ्या मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील आहे. त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.