आईनेच बॉयफ्रेंडकडून करवला तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी महिला भाजपाची पदाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:25 IST2025-06-05T13:25:26+5:302025-06-05T13:25:56+5:30
Crime News: एका आईने तिच्या अल्पवयीन मुलीचं तिच्या मित्रांकरवी लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही भाजपाच्या महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष राहिली आहे.

आईनेच बॉयफ्रेंडकडून करवला तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी महिला भाजपाची पदाधिकारी
आईसाठी तिची मुलं ही जीव की प्राण असतात. मुलांच्या रक्षणासाठी आई प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे पाहत नाही. मात्र उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आई आणि मुलीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका आईने तिच्या अल्पवयीन मुलीचं तिच्या मित्रांकरवी लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही भाजपाच्या महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष राहिली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी महिला आणि तिचा मित्र सुमित पटवाल याला अटक केली आहे. तर त्यांच्या आणखी एका मित्राचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तर हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशुतोष शर्मा यांनी आरोपी महिलेची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिला नेत्याचा बऱ्याच दिवसांपासून तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. तसेच तिची १३ वर्षांची मुलगी ही महिनाभरापासून तिच्या वडिलांसोबतच राहत आहे. मुलगी घरात गप्प गप्प राहत असल्याने वडिलांनी तिची विचारपूस केली. तेव्हा तिने धक्कादायक माहिती दिली. तिने सांगितले की, आईने तिचा बॉयफ्रेंड सुमित पटवाल आणि इतर एका व्यक्तीसोबत मिळून माझं लैंगिक शोषण केलं.
जेव्हा वडिलांनी मुलीची कैफियत ऐकली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पुढील कार्यवाहीस सुरुवात केली. तसेच तपास करून आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. तसेच वैद्यकीय तपासणीमधून पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.