आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:42 IST2026-01-09T16:40:39+5:302026-01-09T16:42:11+5:30
एका चौकात उभ्या असलेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याबाबत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.

आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
जम्मूतील अर्निया येथील एका चौकात उभ्या असलेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याबाबत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. शहीद गुरनाम सिंह आणि त्यांची आई जसवंत कौर यांची ही गोष्ट आहे. आईसाठी तिचा मुलगा हे जग सोडून गेलेला नाही. तो आजही तिच्या समोरच आहे, कारण ही एका आईची माया आहे.
२०२१ मध्ये जेव्हा अर्नियामध्ये कॉन्स्टेबल गुरनाम सिंग यांचा पुतळा बसवण्यात आला, तेव्हा जगासाठी ते अभिमानाचं प्रतीक होतं. मात्र आई जसवंत कौर यांच्यासाठी तो आजही त्यांचा 'लाडका' मुलगा आहे. २०२२ पासून दर हिवाळ्यात जेव्हा जम्मूमध्ये थंडीची पहिली लाट येते, तेव्हा जसवंत कौर एक उबदार ब्लँकेट घेऊन पुतळ्यापाशी पोहोचतात. त्या अत्यंत मायेने त्या पुतळ्याच्या खांद्यावर ब्लँकेट लपेटतात. हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पाणावतात, पण आईच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान असते. जणू काही त्यांनी आपल्या मुलाला थंडीपासून वाचवलं आहे.
"माँ तो माँ ही होती है
— Ravish Kumar Singh (@Ravish_KR_7) January 9, 2026
जसवंत कौर ठंड बढ़ने के बाद अपने बेटे गुरनाम सिंह जी के प्रतिमा पर कंबल ओढ़ा दी , गुरनाम सिंह जी 2016 में आतंकियों से लड़ते हुए शहीद हो गये थे बहुत ही मार्मिक दृश्य है#CelebratingLohri#ISPLSeason3#WhyWomenKill#Parasakthi#உங்க_கனவ_சொல்லுங்க
CBFC pic.twitter.com/fsfhebow7v
आई आठवणींना उजाळा देताना सांगतात की, २६ वर्षांचा गुरनाम जेव्हा शेवटचा भेटला होता, तेव्हा त्यांनी त्याच्या लग्नाची खूप स्वप्नं पाहिली होती. त्यांना वाटलं होतं की पुढच्या वेळी जेव्हा तो सुट्टीवर येईल, तेव्हा घरात सनई-चौघडे वाजतील. पण गुरनामच्या मनात काही वेगळंच होतं. त्याचं 'पहिलं प्रेम' त्याचा गणवेश आणि त्याचा देश होता.
२१ ऑक्टोबर २०१६ रोजी हिरा नगर सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी गुरनाम काळ बनला. त्यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिलं. २२ ऑक्टोबर २०१६ रोजी गोळ्यांनी छिन्नविछिन्न होऊनही गुरनाम मागे हटला नाही आणि अखेर भारतमातेच्या कुशीत विसावला.