मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:31 IST2025-11-19T14:31:05+5:302025-11-19T14:31:55+5:30
भारतात पोहोचताच अनमोल बिश्नोईला एका लांब कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
आंतरराष्ट्रीय गँगस्टर अनमोल बिश्नोईला भारतात आणले जात आहे. भारतात दाखल होताच त्याला अनेक राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात द्यावे लागणार आहे. भारतात पोहोचताच अनमोल बिश्नोईला एका लांब कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल. सर्वात आधी एनआयए त्याची कस्टडी घेईल, कारण अनमोलवर या एजन्सीने १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते आणि तो 'संघटित गुन्हेगारी सिंडिकेट' प्रकरणात वॉन्टेड आहे. एनआयएची कस्टडी संपल्यावर हे प्रकरण दिल्ली पोलीस क्राइम ब्रांचकडे जाईल.
२०२३ मध्ये दिल्लीच्या सनलाईट कॉलनीमध्ये एका व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यासाठी अनमोलने स्वतः धमकीचा फोन केला होता आणि त्याच्या घराबाहेर गोळीबारही केला होता. हे प्रकरण आरके पुरम युनिटने नोंदवले होते. त्यानंतर, दिल्ली पोलीस स्पेशल सेल देखील अनमोलला आपल्या ताब्यात घेईल.
मुंबई, पंजाब आणि राजस्थान पोलीस करणार चौकशी
दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त, देशातील इतर प्रमुख राज्यांचे पोलीसही अनमोलला ताब्यात घेण्यासाठी तयार आहेत. मुंबईतील बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात अनमोलला आपल्याकडे घेऊन जाईल. संपूर्ण नियोजन, शूटर्स आणि शस्त्रास्त्रांची व्यवस्था अनमोलनेच केली होती, असे आरोपपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. सिद्धू मूसेवाला हत्याकांडात पंजाब पोलीस अनमोलला आपल्या राज्यात घेऊन जतील. राजस्थान पोलिसांच्या एफआयआरमध्येही अनमोलचे नाव आहे आणि तेथे त्याच्यावर १ लाख रुपयांचे इनाम होते. अनमोलवर एकूण २० हून अधिक गुन्हे नोंद आहेत.
कोण आहे अनमोल बिश्नोई?
अनमोल बिश्नोई उर्फ भानू, हा देशातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. त्याला लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात आणि गुन्हेगारी सिंडिकेटचा खरा वारसदार मानले जाते. २०१६ मध्ये, लॉरेन्सने अनमोलला शिक्षणासाठी जोधपूरला पाठवले, परंतु तिथेही अनमोलवर मारामारी आणि अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले.
२०१६-१७ दरम्यान, राजस्थान, पंजाब आणि हरियाणातील अनेक मोठ्या व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे काम लॉरेन्सच्या टोळीकडून सुरू होते. याच काळात अनमोलही आपल्या भावासोबत या गुन्ह्यांमध्ये सामील होऊ लागला.
लॉरेन्स बिश्नोई क्राइम कंपनी
अनमोल ज्या टोळीचा सदस्य आहे, त्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे नेटवर्क प्रचंड मोठे आहे. ही टोळी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, चंदीगड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या १३ राज्यांमध्ये पसरलेली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे कॅनडा, अमेरिका, पोर्तुगाल, दुबई, अझरबैजान, फिलिपिन्स आणि लंडनपर्यंत पसरलेले आहे.
गँगचे 'व्हर्च्युअल' मॉडेल
टोळीत सुमारे १००० सदस्य आहेत, ज्यात शूटर, शस्त्रे पुरवणारे, रेकी करणारे, सोशल मीडिया टीम आणि आश्रय देणारे यांचा समावेश आहे. प्रत्येक ऑपरेशनमध्ये सदस्यांना वेगवेगळी कामे दिली जातात आणि त्यांना एकमेकांची ओळखही नसते. संपूर्ण ऑपरेशन सिग्नल ॲप आणि व्हर्च्युअल नंबर वापरून चालवले जाते. लॉरेन्स प्रत्येक सदस्याला व्यक्तिगतपणे ओळखत नसला तरी, आर्थिक मदत करून गँगला एकत्र ठेवतो.
अनमोलसोबत नेमकं काय होणार?
विविध राज्यांच्या कस्टडीनंतर अनमोलला जेव्हा तुरुंगात पाठवले जाईल, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न हा असेल की त्याला तिहार तुरुंगात पाठवले जाईल की, त्याचा भाऊ लॉरेन्स जिथे आहे त्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात? कारण विरोधी टोळ्यांचे लोक अनेक तुरुंगांमध्ये आधीच कैद आहेत आणि अनमोलसाठीही ते एक मोठा धोका ठरू शकतात.