मोसाद-सीआयएने काँग्रेसला पराभूत करण्याचा रचला होता कट; कुमार केतकर यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:34 IST2025-11-27T16:24:45+5:302025-11-27T16:34:10+5:30
काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवरुन मोठा दावा केला आहे.

मोसाद-सीआयएने काँग्रेसला पराभूत करण्याचा रचला होता कट; कुमार केतकर यांचा मोठा दावा
Congress Kumar Ketkar:काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आणि भाजपला सत्तेत आणण्यासाठी षडयंत्र रचले होते, असे मत कुमार केतकर त्यांनी व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना, राज्यसभा सदस्य राहिलेल्या केतकर यांनी २०१४ च्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १४५ जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत ही संख्या वाढून २०६ पर्यंत पोहोचली होती. जर हाच क्रम सुरू राहिला असता, तर २०१४ मध्ये काँग्रेस २५० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत आली असती. मात्र, २०१४ मध्ये काँग्रेसच्या जागा थेट ४४ पर्यंत खाली आल्या. हा आकड्यांमधील अचानक आलेला बदल अत्यंत आश्चर्यकारक आहे," असे कुमार केतकर यांनी म्हटले.
'काँग्रेसला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळ'
केतकर यांनी दावा केला की, २०१४ च्या निवडणुकीपूर्वीच हा खेळ'सुरू झाला होता आणि काँग्रेसच्या जागा वाढू नयेत असा निर्णय घेण्यात आला होता. "अशा संस्था होत्या ज्यांनी जोपर्यंत आपण काँग्रेसला २०६ च्या खाली आणत नाही, तोपर्यंत आपण येथे (भारतात) आपले काम करू शकणार नाही, या पद्धतीने काम केले. यापैकी एक संघटना सीआयए होती आणि दुसरी इस्रायलची मोसाद होती," असं केतकर यांनी म्हटलं.
या दोन्ही गुप्तचर संस्थांनी भारतात हस्तक्षेप करण्यासाठी आणि आपली धोरणे लागू करण्यासाठी एक अनुकूल सरकार आणण्याचे ठरवले होते. जर काँग्रेसचे स्थिर सरकार किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आले असते, तर त्यांना भारताच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करता आला नसता, असा दावा केतकर यांनी केला. त्यांच्या मते, सीआयए आणि मोसाद या दोन्ही गुप्तचर संस्थांना वाटत होतं की, भारतात त्यांचे नियंत्रण असलेले अनुकूल सरकार असले पाहिजे आणि ते काँग्रेसचे नसावे.
केतकर यांनी मोसादवर थेट आरोप करताना म्हटले, "मोसादने राज्ये आणि मतदारसंघांचा विस्तृत डेटा तयार केला आहे. सीआयए आणि मोसादकडे राज्ये आणि मतदारसंघांचा विस्तृत डेटा आहे. " २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दल काही प्रमाणात असंतोष असला तरी, काँग्रेसच २०६ वरून थेट ४४ जागांवर येईल, इतका असंतोष नक्कीच नव्हता, असा दावा केतकर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात आणि खासकरून काँग्रेसच्या गोटात मोठी चर्चा सुरू झाली आहे.