मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:33 IST2025-11-15T19:32:05+5:302025-11-15T19:33:03+5:30
महत्वाचे म्हणजे, फरीदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात राहत असतानाही ती याच नंबरचा सर्वाधिक वापर करायची. तिने या बनावट पत्त्याचा वापर, संशयास्पद हालचाली लपवण्यासाठी केला असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे...

मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
फरीदाबाद जैश मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित डॉ. शाहीन शाहिद संदर्भात तपास यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शाहीन एका बनावट पत्त्यावर घेतलेले मोबाइल सिमकार्ड वापरत होती. ती बहुतांश संपर्क आणि कामे याच सिमकार्डद्वारे करत होती. यामुळे तपास यंत्रणांचा संशय अधिक मजबूद झाला आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शाहीनने 2023 मध्ये फरीदाबादमधील धौज येथील एका मशिदीच्या पत्त्यावर हे सिमकार्ड घेतले होते. हा पत्ता तिचा कायमस्वरूपी पत्ता नव्हता, तसेच या भागाशी तिचा थेट संबंध असल्याचेही दिसत नाही.
महत्वाचे म्हणजे, फरीदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात राहत असतानाही ती याच नंबरचा सर्वाधिक वापर करायची. तिने या बनावट पत्त्याचा वापर, संशयास्पद हालचाली लपवण्यासाठी केला असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शाहीनने लखनऊ येथील तिच्या वडिलांच्या घराचा वापर कधीही कायमस्वरूपी पत्त्यासाठी केला नाही. ती नेहमी तिचा भाऊ डॉ. परवेझ अन्सारीच्या घराचाच पत्त्यासाठी वापर करायची. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. महत्वाचे म्हणजे, परवेझ अन्सारीही संशयाच्या आणि तपासाच्या कक्षेत आहे.
आतापर्यंतच्या तपासात शाहीनच्या प्रवासाची माहितीही समोर आली आहे. 2013 मध्ये कानपूरची नोकरी सोडल्यानंतर ती काही दिवसांसाठी थायलंडला गेली होती. या प्रवासाचा उद्देश काय होता? ती तेथे कुणा कुणाला भेटली? याचा तपास यंत्रणा करत आहेत. या शिवाय, दोन महिन्यांपूर्वी ती लखनऊला आली होती, तेव्हा परवेझ अन्सारीला घेऊन कानपूरलाही गेली होती. यासंदर्भातह युपी एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा शोध घेत आहेत.
तत्पूर्वी, शाहीनच्या कारमधून एके-47 आणि पिस्तूल आदी शस्त्रे जप्त करण्यात आली होती. यामुळे तिचे यूपी कनेक्शन, बनावट सिमकार्डचा वापर आणि फरीदाबाद मॉड्युलमधील तिची भूमिका, यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे.