निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:08 IST2025-10-04T15:07:25+5:302025-10-04T15:08:48+5:30
Father Throws Daughter Into Canal: पंजाबमधील फिरोजपूर येथे माणुसकीला हादरवून टाकणारी एक अत्यंत क्रूर घटना घडली.

निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
पंजाबमधील फिरोजपूर येथे माणुसकीला हादरवून टाकणारी एक अत्यंत क्रूर घटना घडली. गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या मुलीला हात-पाय बांधून कालव्यात फेकून दिले. धक्कादायक म्हणजे, आरोपी वडिलांनी या भयानक कृत्याचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला, ज्यामुळे हा गुन्हा जगासमोर आला. मुलीच्या नातेवाईकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना तातडीने अटक केली.
फिरोजपूर येथील रहिवासी असलेला आरोपी सुरजीत सिंग याला त्याच्या मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. वारंवार समजावून सांगूनही मुलीने त्याचे ऐकले नाही, या रागातून त्याने हे क्रूर पाऊल उचलले. घटनेच्या दिवशी, आरोपी सुरजीत सिंगने पत्नीच्या उपस्थितीत प्रथम मुलीचे हात दोरीने बांधले आणि रात्रीच्या वेळी तिला कालव्याच्या काठावर घेऊन गेला.
कालव्याच्या काठावर पोहोचल्यावर त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग सुरू केली. व्हिडिओमध्ये आरोपी वडिलांनी बांधलेल्या मुलीचे हात बांधून तिला कालव्यात ढकलून दिले. त्यावेळी मुलीची आईही तिथे उपस्थित होती. हे क्रूर कृत्य पाहून मुलीची आई ढसाढसा रडू लागली.
वडिलांनीच काढलेला हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी तत्परतेने कारवाई केली. एसएसपी भूपिंदर सिंग सिद्धू यांनी माहिती दिली की, आरोपी वडील सुरजीत सिंग याला अटक करण्यात आली असून त्याने चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
"मुलीला अनेकदा समजावूनही तिने ऐकले नाही, ज्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले", असे आरोपीने पोलिसांना सांगितले आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पोलीस कोठडीत आहे. तर, पोलिस पथके सध्या गोताखोरांच्या मदतीने कालव्यात मुलीचा शोध घेत आहेत.