मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 13:33 IST2023-07-26T13:32:47+5:302023-07-26T13:33:43+5:30
Monsoon Session 2023: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला.

मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप
Monsoon Session 2023: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत वक्तव्याची मागणी करत आहेत. बुधवारीही या प्रकरणावरुन गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर अपमान केल्याचा आरोप केला.
राज्यसभेत बोलताना खर्गे म्हणाले की, काल (25 जुलै) बोलत असताना माझा माईक बंद करण्यात आला होता. खर्गे बोलत असताना काँग्रेसचे खासदार त्यांच्या मागे उभे राहिले. अध्यक्षांनी काँग्रेस सदस्यांच्या उभे राहण्यावर आक्षेप नोंदवला, त्यावर खर्गे म्हणाले की, ते माझ्यामागे नाही तर मोदींच्या मागे उभे राहतील का? खर्गे असे म्हणताच सभागृहातील भाजप खासदारांनी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
बुधवारीही विरोधकांचा गोंधळ
बुधवारी (26 जुलै) राज्यसभेचे कामकाज सुरू होताच खासदारांनी कारगिल दिन आणि जवानांना अभिवादन केले. यानंतर मणिपूर मुद्द्यावरून संसदेत गदारोळ सुरू झाला. अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेत्याला आपापल्या सदस्यांना शांत करण्यास सांगितले. गदारोळ शांत होत नसल्याचे पाहून राज्यसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.