मुंबई/ नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला (१४ मे) यंदा विवाहाचा मुहूर्त चुकणार आहे. यंदा कर्तव्य असणाऱ्यांना दणक्यात लग्नाचा बार उडविता येणार नाही.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गेल्या वर्षी कोरोनामुळे लग्न पुढच्या यंदा करण्याचे ठरवलेल्या कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले. एकट्या उत्तर प्रदेशात जवळपास ३० हजार लग्ने रखडली आहेत. यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान ३७ मुहुर्त होते. मेमध्ये शुभ दिवस जास्त होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लखनौत पाच ते सहा हजार विवाह लागणार होते. त्यातील ९५ टक्के लग्ने रद्द झाली.
१३,१५,२१,२२,२३,२६,२९,३०,३१ मे रोजी चांगली तिथी होती. जूनमध्ये १५ तर जुलैमध्ये सात मुहूर्त आहेत. जून व जुलैमध्ये नेमके काय होईल हे माहीत नसल्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये लग्नाचे बुकिंग आधीच फुल्ल झाले आहे. तारखांचा शोध सुरू झाला आहे. आधीच बुकिंग रद्द झाल्यामुळे सगळे पैसेही अनेकांना मिळालेले नाहीत.
छत्तीसगडमधील बहुतेक जिल्ह्यांत लॉकडाउन असल्यामुळे तेथे आता विवाह होत नाहीत. मध्यप्रदेशमध्ये कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे मे महिन्यातील सर्व विवाह लांबणीवर गेले आहेत. उत्तराखंडमध्ये अक्षय तृतीयेला मोठ्या संख्येत लग्न होतात. परंतु, यंदा लोक लग्ने टाळत आहेत.
बँडवाले, केटरर्स, डीजेवाल्यांनाही फटका - विवाह समारंभ साध्या पद्धतीने आणि मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत होत असल्याने मंगल कार्यालयापासून केटरर्सपर्यंत अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. मंगल कार्यालये ओस पडली आहेत. - फुले, रोषणाई, मातीची भांडी, घोडा, केटरर्सचा व्यवसाय थंडावला आहे. सोने, चांदी, दागदागिन्यांच्या खरेदीवरही मर्यादा आल्या आहेत. ना बँड, ना बाजा ना बारात अशी परिस्थिती असल्याने डीजेही धूळखात पडून आहेत. कपडेलत्ते यांची खरेदी होत असली तरी बस्ता बांधण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लग्न लावणाऱ्या गुरुजींपासून ते अनेकांचे उत्पन्न बुडाले आहे.