"२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना"; BLO अधिकाऱ्याने घेतला जगाचा निरोप, कामाच्या दबावाचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:23 IST2025-12-01T13:20:21+5:302025-12-01T13:23:37+5:30
उत्तर प्रदेशात आणखी एका बीएलओ कर्मचाऱ्याने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

"२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना"; BLO अधिकाऱ्याने घेतला जगाचा निरोप, कामाच्या दबावाचा उल्लेख
UP BLO Death: निवडणुकीच्या मतदार यादी सुधारणा कामाच्या प्रचंड दबावामुळे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका ४६ वर्षीय बूथ-लेव्हल ऑफिसरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्वेश सिंह असे या मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.गेल्या काही आठवड्यांमध्ये, अनेक बीएलओ अधिकाऱ्यांनी कामाचा ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ११ हून अधिक राज्यांमध्ये मतदार यादी सुधारणा प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.
आत्महत्येपूर्वीचा हृदयद्रावक व्हिडीओ
सर्वेश सिंह हे शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि ७ ऑक्टोबर रोजी त्यांची पहिल्यांदाच बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते प्रचंड दु:खी आणि हताश दिसत आहेत आणि ढसाढसा रडत आहेत. व्हिडीओमध्ये सर्वेश सिंह यांनी आपल्या आई आणि बहिणीची माफी मागितली आहे आणि त्यांच्या लहान मुलींची काळजी घेण्याची विनंती केली आहे.
"आई, माझ्या मुलींची काळजी घे. कृपया मला माफ कर. मी दिलेले काम पूर्ण करू शकलो नाही. मी आता एक कठोर पाऊल उचलणार आहे. मी खूप संकटात आहे. गेल्या २० दिवसांपासून मी व्यवस्थित झोपू शकलो नाही. मला चार लहान मुली आहेत. इतर लोक हे काम पूर्ण करू शकले, पण मी नाही," असं सर्वेश सिंह म्हणाले.
आपल्या बहिणीला उद्देशून म्हणाले, "मी या जगातून खूप दूर जात आहे. सॉरी, ताई, माझ्या अनुपस्थितीत, कृपया माझ्या मुलांची काळजी घे. माझ्या या निर्णयासाठी कोणालाही दोष देऊ नये आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याबद्दल कोणताही प्रश्न विचारू नये.
सुसाईड नोटमध्येही कामाच्या ताणाचा उल्लेख
रविवारी पहाटे सर्वेश सिंह यांची पत्नी बबली देवी यांना ते घरातील स्टोअर रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळावरून जिल्हा बेसिक शिक्षण अधिकाऱ्याला उद्देशून लिहिलेली दोन पानांची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. या नोटमध्ये सिंह यांनी एसआयआरचे लक्ष्य वेळेत पूर्ण करू न शकल्यामुळे आलेल्या नैराश्याचा उल्लेख केला आहे.
"मी रात्रंदिवस काम करत आहे, पण मी एसआयआरचे लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीये. काळजीमुळे माझ्या रात्री असह्य झाल्या आहेत. मी फक्त दोन ते तीन तास झोपतो. मला चार मुली आहेत, त्यापैकी दोन आजारी आहेत. कृपया मला माफ करा," असे त्यांनी नोटमध्ये लिहिले आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या या एसआयआर अभियानामुळे सिंह सतत सर्वेक्षण, डेटा तपासणी आणि वारंवार होणाऱ्या रिपोर्टिंगमुळे प्रचंड तणावाखाली होते. जिल्हाधिकारी अनुज कुमार सिंह यांनी या घटनेची दखल घेतली असून शिक्षकाच्या कामाची गुणवत्ता चांगली असल्याचे सांगितले. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट होती. त्यांना मदत करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय आणि पोलीस तपास दोन्ही सुरू आहेत. आम्ही कुटुंबाला शक्य ते सर्व सहकार्य करू," असे त्यांनी स्पष्ट केले.