मोदीजी फाईल्स जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाही, राहुल गांधींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 20:27 IST2019-04-30T20:26:08+5:302019-04-30T20:27:21+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना मंगळवारी शास्त्री भवनमध्ये लागलेली आग ही मोदींच्या सांगण्यावरून लावण्यात आली होती असा आरोप केला आहे.

Modi ji burning files is not going to save you - Rahul Gandhi | मोदीजी फाईल्स जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाही, राहुल गांधींचा इशारा

मोदीजी फाईल्स जाळल्या तरी तुम्ही वाचणार नाही, राहुल गांधींचा इशारा

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या उत्तरार्धात प्रचार टिपेला पोहोचला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना मंगळवारी शास्त्री भवनमध्ये लागलेली आग ही मोदींच्या सांगण्यावरून लावण्यात आली होती असा आरोप केला आहे. तसेच आग लावून फाइल्स जाळल्या तरी मोदी वाचणार नाहीत असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. 

 आज राजधानी दिल्लीतील शास्त्री भवन या इमारतीला आग लागल्याचे वृत्त आले होते. तसेच ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी आले होते. मात्र या आगीत झालेल्या नुकसानीबाबत माहिती येण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींवर आरोप केला आहे. ''मोदीजी आग लावून फाईल्स जाळल्यामुळे तुम्ही वाचणार नाही. तुमच्या निकालाचा दिवस जवळ येत आहे." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 





 आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शास्त्री भवनमध्ये आग लागली होती. दरम्यान, दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले गेले. दरम्यान, राहुल गांधी यांनी नेमका कोणत्या फाइल्ससंदर्भात आरोप केला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. 

 दरम्यान,  'चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली होती. राफेल विमान करार प्रकरणात फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राफेल विमान करारप्रकरणात 'चौकीदार चोर है' ही बाब सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याविरोधात भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. 

Web Title: Modi ji burning files is not going to save you - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.