मोदी सरकार घटनात्मक मूल्ये आणि परंपराविरोधी, सोनिया गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 19:59 IST2020-08-15T19:58:14+5:302020-08-15T19:59:49+5:30

मोदी सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मूल्ये आणि स्थापित परंपरांच्याविरोधात उभे आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला.

Modi government is against constitutional values and tradition, Sonia Gandhi's attack on the Center | मोदी सरकार घटनात्मक मूल्ये आणि परंपराविरोधी, सोनिया गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

मोदी सरकार घटनात्मक मूल्ये आणि परंपराविरोधी, सोनिया गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

नवी दिल्ली - देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एक संदेश प्रसारित करून यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मूल्ये आणि स्थापित परंपरांच्याविरोधात उभे आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सोनिया गांधी म्हणाल्या की, केवळ लोकशाही मूल्ये, विविध भाषा, धर्म आणि संप्रदायांच्या विपुलतेमुळेच नव्हे तर आपल्या भारताची कीर्ती ही प्रतिकूल परिस्थितीचाही एकजुटीने सामना करण्यासाठीही पसरलेली आहे. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाशी झुंजत आहे. या परिस्थितीत भारताने एकजुट होऊन या साथीचा सामान केला पाहिजे. आपण सर्वजण एकत्र येऊन ही साथ आणि गंभीर आर्थिक संकटामधून बाहेर येऊ, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

, गेल्या ७४ वर्षांच्या काळात आपण लोकशाही मूल्यांना वेळोवेळी परीक्षेच्या कसोटीवर परखून पाहिले आहे. तसेच नियमितपणे त्यात अधिकाधिक सुधारणा केली आहे. मात्र आजच्या काळात सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मुल्ये आणि स्थापित परंपरांच्या विरोधात उभे आहे, असे वाटते. भारतीय लोकशाहीसाठी हा चिंतेचा काळ आहे, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला.

यावेळी सोनिया गांधी यांनी चीन आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या संघर्षावरही आपलं मत मांडलं. कर्नल संतोषबाबू आणि आमच्या २० जवानांना गलवान खोऱ्यात वीरमरण आल्याच्या घटनेला आता साठ दिवस होऊन गेले आहेत. मी त्यांचे स्मरण करून त्यांच्या हौतात्म्याला वंदन करते. आता सरकारनेही त्यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांचा योग्य तो सन्मान करावा, असे मी सरकारला आवाहन करते, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे. आज देशात बोलण्याचे, लिहिण्याचे, प्रश्न विचारण्याचे, असहमती व्यक्त करण्याचे, विचार मांडण्याचे, उत्तर मागण्याचे स्वातंत्र्य आहे का? याचा विचार देशातील जनतेने अंतरात्म्याला स्मरून करावा. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही देशाचे लोकशाहीच्या रक्षणासाठी शक्य तेवढी मदत करू.

Web Title: Modi government is against constitutional values and tradition, Sonia Gandhi's attack on the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.