स्टेअरिंग खेचलं, गाडी उलटवली अन् पोलिसांवरच तुटून पडले! ATM लुटणाऱ्याला सोडवण्यासाठी थरारक राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 20:44 IST2026-03-11T20:40:13+5:302026-03-11T20:44:15+5:30

हरियाणामध्ये आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला.

mob attacked a police team in Haryana Attempts are being made to rescue the mastermind of the ATM robber | स्टेअरिंग खेचलं, गाडी उलटवली अन् पोलिसांवरच तुटून पडले! ATM लुटणाऱ्याला सोडवण्यासाठी थरारक राडा

स्टेअरिंग खेचलं, गाडी उलटवली अन् पोलिसांवरच तुटून पडले! ATM लुटणाऱ्याला सोडवण्यासाठी थरारक राडा

Haryana Crime: हरियाणातील नूह जिल्ह्यातील मेवात परिसरात मंगळवारी संध्याकाळी प्रचंड राडा झाला. एटीएम लुटीचा मास्टरमाइंड असलेल्या आरोपीला घेऊन जाणाऱ्या मेघालय पोलिसांच्या पथकावर स्थानिक जमावाने हल्ला चढवला. आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जमावाने चक्क पोलिसांची शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी स्वसंरक्षार्थ केलेल्या गोळीबारात एका तरुणाच्या पायाला गोळी लागली असून या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

थरार कसा सुरू झाला?

मेघालयमध्ये एटीएम मशीन फोडून लूट केल्याप्रकरणी राहुल खान या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला नूह पोलिसांनी अटक केली होती. पुन्हाना न्यायालयाने त्याला मेघालय पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. मंगळवारी संध्याकाळी मेघालय पोलिसांचे पथक राहुलला घेऊन जिप्सीतून निघाले होते.

आरोपीने गाडी उलटवण्याचा केला प्रयत्न

अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाव सिकरावा जवळील एका हॉटेलपाशी गाडी पोहोचली असता, आरोपी राहुलने अचानक गाडीचे स्टेयरिंग पकडले आणि चालत्या गाडीचा ताबा घेऊन ती उलटवण्याचा प्रयत्न केला. पोलीस गोंधळलेले असतानाच तिथे २० ते ३० लोकांचा जमाव जमा झाला, ज्यात महिलांचाही समावेश होता.

पोलिसांवर हल्ला आणि गोळीबार

जमावाने पोलिसांच्या गाडीला घेराव घातला, गाडीची चावी हिसकावून घेतली आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट करत त्यांची सरकारी शस्त्रे काढून घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर बनल्याने मेघालय पोलिसांनी स्वसंरक्षार्थ गोळीबार केला. यामध्ये तारीफ खान नावाच्या स्थानिक तरुणाच्या पायाला गोळी लागली. त्याला तातडीने रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

३० जणांवर गुन्हे दाखल

पिनंगवा पोलिसांनी याप्रकरणी मेघालय पोलिसांच्या तक्रारीवरून १२ नामजद आरोपींसह ३० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राहुल खान हा केवळ मेघालयमध्येच नव्हे, तर दिल्ली, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही एटीएम लुटीच्या अनेक गुन्ह्यांत हवा आहे.

अफवा पसरवणाऱ्यांना कडक इशारा

नूह पोलिसांनी सोशल मीडियावर कडक पाळत ठेवली आहे. या घटनेबाबत कोणतीही अफवा किंवा चिथावणीखोर माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. सध्या आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: mob attacked a police team in Haryana Attempts are being made to rescue the mastermind of the ATM robber