मिशन २०२४: भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करणार, आंध्र, बिहार, तामिळनाडू आणि हरयाणामध्ये रणनीतीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 06:42 IST2022-09-03T06:35:00+5:302022-09-03T06:42:22+5:30
BJP News: भाजपचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांबाबत आपली रणनीती नव्याने ठरवीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मिशन २०२४: भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करणार, आंध्र, बिहार, तामिळनाडू आणि हरयाणामध्ये रणनीतीत बदल
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांबाबत आपली रणनीती नव्याने ठरवीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ज्या चंद्राबाबू नायडूंवर आरोप करत होते की, ते घराणेशाहीचे राजकारण करतात आणि भ्रष्ट आहेत. पण, आता त्यांनाच तेलुगू देसमच्या चंद्राबाबू यांच्यासोबत युती हवी आहे.
आगामी संभाव्य धोका लक्षात घेता महत्त्वाच्या आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि हरयाणा या राज्यात पक्षाने आपल्या रणनीतीत बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नायडूंसोबत एक बैठक झाली आहे. त्यानंतर नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या रूपरेषेवर चर्चा केली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तेलुगू देसमने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आंध्रमध्ये सत्ताधारी वायएसआरसीपीसोबत युती करण्यासाठी भाजप उत्सुक होता. मात्र, राजकीय अपरिहार्यतेमुळे ते शक्य झाले नाही. तामिळनाडूत ईपीएस आणि ओपीएस गटांना एकत्र आणण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केरळात बोलताना स्पष्ट केले होते की, सर्व भ्रष्ट विरोधी पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरुद्ध एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे केवळ राज्यातच नव्हे तर, बाहेरही भाजपविरुद्ध एक संभाव्य चेहरा आहेत. नितीशकुमार यांनी प्रदेश में दिखा, देश में देखेंगे अशा घोषणा देत आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली आहे.
देवीलाल कुटुंबातील गटांना एकत्र आणणार?
हरयाणात देवीलाल यांच्या कुटुंबातील तीन गटांना एकत्र आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. हरयाणातील दोन गट दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वातील जेजेपी आणि रणजित कुमार हे आधीच एनडीएचा भाग आहेत. मात्र, भाजपची अशी इच्छा आहे की, अभय चौटाला यांच्या नेतृत्वातील आयएनएलडीने सोबत यावे. जेणेकरून, भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वातील काँग्रेसशी लढता येईल. तसेच लोजपातील दोन गटांत तडजोड करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.