minister demanding bollywood actresses for clearing project says bjp mp subramanian swamy | मंत्र्यानं लाच म्हणून मागितल्या दोन बॉलिवूड अभिनेत्री; सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनं खळबळ
मंत्र्यानं लाच म्हणून मागितल्या दोन बॉलिवूड अभिनेत्री; सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनं खळबळ

मुंबई: लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची मागणी करणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा सवाल भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केला. याबद्दलची माहिती असल्यास ती द्या, असं आवाहनदेखील त्यांनी ट्विटरवर केलं. त्यामुळे अभिनेत्रींची मागणी करणारा तो मंत्री कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

मी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा अभ्यास करत आहे, असं स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'एखाद्या मंत्र्यानं प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री पुरवण्याची मागणी केल्यास त्याच्यावर कोणत्या कायद्याच्या आधारे कारवाई करता येईल? याबद्दल मी अभ्यास करत आहे. काही सूचना असल्यास कळवा. मी संशोधन करत असलेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात त्या कामी येतील,' असं स्वामींनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटमुळे एकच खळबळ माजली आहे.
प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री पुरवण्याची मागणी करणाऱ्या मंत्र्याचं नाव स्वामींनी जाहीर केलेलं नाही. स्वामींच्या या ट्विटची राजकीय वर्तुळासोबतच बॉलिवूडमध्येही मोठी चर्चा आहे. स्वामींनी केलेले आरोप अतिशय धक्कादायक असल्याचं ज्येष्ठ वकील आभा सिंह यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. स्वामी या प्रकरणी जेव्हा खटला दाखल करतील, तेव्हा त्याची चौकशी करण्यापेक्षा आताच एफआयआर दाखल करून त्याची योग्य चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सिंह यांनी केली. 


Web Title: minister demanding bollywood actresses for clearing project says bjp mp subramanian swamy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.