१२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:58 IST2025-01-13T08:57:32+5:302025-01-13T08:58:22+5:30

Mahakumbh 2025 : भारत देश हा अध्यात्मासाठी जगभर ओळखला जातो. अध्यात्माच्या माध्यमातून मन:शांती मिळवता येते, अशी आता जगभर मान्यता आहे.

Millions of devotees from 125 countries attend Mahakumbha | १२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी

१२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी

Mahakumbh 2025 : दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र असं स्थान आहे. त्यातही महाकुंभमेळ्याचं स्थान तर अतिविशिष्ट. यंदा हा महाकुंभ आजपासून म्हणजे १३ जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू होत आहे. २६ फेब्रुवारीला या महाकुंभाची समाप्ती होणार असून, त्यासाठी केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातीलही अनेक भाविकांचं आणि पर्यटकांचं लक्ष लागून आहे. 
भारतीयांसाठी तर हा उत्सव जीव की प्राण असतोच; देशभरातून कोट्यवधी भाविक या धार्मिक सोहळ्याला आवर्जून हजेरी लावतात आणि आपल्या आयुष्याचं ‘सार्थक’ करतात; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय भाविकांसह परदेशी भाविकांनाही गेल्या काही वर्षांपासून कुंभमेळ्याचं मोठं आकर्षण आहे.

भारत देश हा अध्यात्मासाठी जगभर ओळखला जातो. अध्यात्माच्या माध्यमातून मन:शांती मिळवता येते, अशी आता जगभर मान्यता आहे. कुंभमेळ्यानिमित्त मोठमोठे ऋषी, साधुसंतही हजेरी लावत असतात. या संतांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांच्याकडून काही शिकावं आणि पदरी पुण्य पाडून घ्यावं, यासाठी सगळ्यांचाच आटोकाट प्रयत्न असतो. 

अलीकडे अध्यात्म समजून घेण्यासाठी, मन:शांती मिळवण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक, श्रद्धाळू येत असतात. यंदाच्या महाकुंभानिमित्त तब्बल १२५ पेक्षाही अधिक देशांचे भाविक, पर्यटक प्रयागराजला हजेरी लावतील, असा अंदाज आहे. परदेशी पर्यटकांना मुळात भारताचं, भारतीय अध्यात्माचं आकर्षण, त्यात महाकुंभ म्हणजे तर या सगळ्याचा कळस. ही ‘पर्वणी’ साधण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. जवळपास एकूण ४० कोटी भाविक या महाकुंभाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यात लाखो परदेशी भविक असतील. महाकुंभासाठी जगभरातील टुर ऑपरेटर्सकडे पर्यटकांनी रांगा लावल्या आहेत. त्यातही पर्वण्यांच्या तारखांना बुकिंग प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे.  

जाणकारांचं म्हणणं आहे, केवळ भारतीय अध्यात्माच्या मोहानं असंही वर्षभर अनेक परदेशी भाविक भारतात येत असतात; पण कुंभमेळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या काळात जे परदेशी भाविक इथे येतात, ते इथलं वातावरण पाहून अत्यंत भारावून जातात, त्यांना अनेक अनोखे अनुभवही येतात आणि असे बरेचसे भाविक भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात किंवा त्यानंतरच्या काळात त्यांच्या भारताच्या वाऱ्या वाढत जातात. भारतीय अध्यात्माच्या ओढीनं यंदा असे परदेशी भाविक विक्रमी संख्येनं भारतात स्थायिक होण्याचा विचार करतील.

यंदाच्या प्रयागराज महाकुंभानिमित्त अनेक लहान-मोठ्या देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, युरोप येथील सुमारे एक हजारपेक्षाही अधिक टुर ऑपरेटर्सनी उत्तर प्रदेश पर्यटन विभागाशी संपर्क साधला. अनेक परदेशी पर्यटक आधीच भारतात दाखल झाले आहेत. भारतीय आध्यात्मिक अनुभूतीसाठी हे सारेच भाविक, पर्यटक अतिव इच्छुक असून विशेषत: लक्झरी निवासाला त्यांनी विशेष पसंती दिली आहे. उच्च दर्जाच्या सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्कॉन मंदिरातील खोल्या आणि पंचतारांकित हॉटेल्सना त्यांनी विशेष पसंती दिली आहे.

त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, बहारीन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या भाविकांचा प्रामुख्यानं समावेश आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या आणि प्राचीन भारतीय अध्यात्माच्या शोधासाठी भारतात येणाऱ्या या भाविकांना तशाच प्रकारचा अनुभव मिळावा, यासाठी अनेक पर्यटक कंपन्याही प्राधान्यानं प्रयत्न करताहेत. बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या या पर्यटकांना ‘नाराज’ करण्याची कोणाचीही तयारी नाही. केवळ पर्यटक कंपन्याच नव्हे, तर सरकारही या पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे आणि त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीनं काळजी घेण्यात येत आहे. 

परदेशी पर्यटकांना विशेषकरून प्रश्न येतो, तो भाषेचा. त्यांची ही समस्या सुटावी, यासाठीही शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी ज्यांचं परकीय भाषांवर प्रभुत्व आहे, अशा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नोंदणी पर्यटन विभागानं केली आहे. हे विद्यार्थी परदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांची आध्यात्मिक, सांस्कृतिक अनुभूती समृद्ध करण्यासाठी मदत करतील. 

परदेशी भाविकांना शाहीस्नानाची आस!
दर बारा वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. बारा कुंभमेळ्यांचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ आयोजित केला जातो. म्हणजेच दर १४४ वर्षांनंतर महाकुंभ येतो. या ऐतिहासिक महाकुंभाचं आयोजन यंदा प्रयागराज येथे करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आत्यंतिक महत्त्व आहे. कुंभमेळ्यातील शाहीस्नानांचं महत्त्व तर अपरंपार. शाहीस्नानाची आणि मोक्षप्राप्तीची संधी आपल्यालाही मिळावी, यासाठीही परदेशी भाविक प्रचंड इच्छुक असतात.

Web Title: Millions of devotees from 125 countries attend Mahakumbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.