हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:16 IST2025-11-20T14:13:48+5:302025-11-20T14:16:53+5:30
अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत झाल्यावर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले की सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

फोटो - आजतक
मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत झाल्यावर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले की सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुलाला टाके घालावे लागले होते, परंतु असा आरोप आहे की, डॉक्टरांनी जखमेवर पाच रुपयांच्या फेविक्विकने एक पॅच लावला. यामुळे मुलाला रात्रभर वेदना होत राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी रुग्णालयात डॉक्टरांना फेविक्विक काढून टाकण्यासाठी तीन तास लागले.
मेरठमधील जागृती विहार एक्सटेंशनमधील मेपल्स हाइट्समध्ये ही भयंकर घटना घडली. फायनान्सर सरदार जसविंदर सिंग यांचा अडीच वर्षांचा मुलगा मनराज संध्याकाळी घरी खेळत असताना त्याला टेबलचा कोपरा लागला. दुखापत त्याच्या डोळ्याजवळ होती आणि त्यातून रक्त येऊ लागलं. मुलाला रडताना पाहून कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेलं.
कुटुंबाचा आरोप आहे की, तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी जखमेची नीट तपासणी केली नाही किंवा प्रथमोपचार केले नाही. टाके तर सोडाच, त्यांनी पालकांना बाहेरून पाच रुपयांचं फेविक्विक आणण्यास सांगितलं. कुटुंबाने डॉक्टरांवर विश्वास ठेवून ते आणलं. जखम साफ करण्याऐवजी, डॉक्टरांनी लागलेल्या जागेवर फेविक्विक चिकटवलं. जसविंदर सिंग म्हणतात की, मुलाला सतत वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्यांना वारंवार आश्वासन दिलं की मुलगा फक्त घाबरला आहे आणि वेदना काही वेळात कमी होतील. परंतु कमी होण्याऐवजी रात्रभर वेदना वाढतच राहिल्या.
मुलाची अस्वस्थता पाहून पालकांची चिंता वाढत गेली. सकाळी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेलं. जेव्हा डॉक्टरांना कळलं की फेविक्विक जखमेवर लावण्यात आलं आहे, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की परिस्थिती अत्यंत धोकादायक असू शकते. जर फेविक्विक थोडसं तरी डोळ्यात गेलं असतं तर मुलाच्या दृष्टीवर परिणाम झाला असता.
रुग्णालयातील डॉक्टरांना फेविक्विक काढण्यासाठी जवळजवळ तीन तास लागले. काळजी घेत, त्यांनी त्वचेला आणि डोळ्यांना नुकसान होऊ नये म्हणून फेविक्विकचा थर काढून टाकला. फेविक्विक काढून टाकल्यानंतर, जखम दिसली आणि डॉक्टरांनी ताबडतोब चार टाके घातले. जसविंदर सिंग म्हणाले, "एक डॉक्टर इतका बेजबाबदार कसा असू शकतो हे आम्हाला समजलं नाही. त्यांनी योग्यरित्या टाके घालायला हव्या असलेल्या जखमेवर फेविक्विक लावलं." याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.