मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर ९ जणांचे डोळे काढण्याची आली वेळ; गोरखपूरमधील 'त्या' खासगी हॉस्पिटलचा भयंकर कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:35 IST2026-02-19T18:34:39+5:302026-02-19T18:35:35+5:30
गोरखपूरमधील एका खाजगी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकांना डोळ्यांचा संसर्ग झाला.

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर ९ जणांचे डोळे काढण्याची आली वेळ; गोरखपूरमधील 'त्या' खासगी हॉस्पिटलचा भयंकर कारभार
Medical Negligence in Gorakhpur: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एका खासगी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ऑपरेशन करून घेतलेल्या अनेक रुग्णांना भीषण इन्फेक्शन झाले. हे इन्फेक्शन इतके पसरले की, आतापर्यंत ९ रुग्णांना आपले डोळे गमवावे लागले असून त्यांच्यावर दिल्ली, लखनऊ आणि वाराणसीमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील न्यू राजेश हायटेक हॉस्पिटल येथे १ फेब्रुवारी रोजी एका मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ३० लोकांच्या मोतियाबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, ऑपरेशननंतर अवघ्या २४ तासांतच रुग्णांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. १८ रुग्णांच्या डोळ्यांत गंभीर संसर्ग झाला, ज्यापैकी ९ जणांना डोळे काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश
रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. एका नातेवाईकाने सांगितले की, "ऑपरेशन करून घरी आल्यानंतर रात्री डोळ्यांत प्रचंड वेदना सुरू झाल्या. आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे एकही डॉक्टर नव्हता. एका कंपाउंडरने इंजेक्शन दिले, पण त्याने काहीच फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी चक्क हात वर केले आणि रुग्णांना दिल्लीला नेण्याचा सल्ला दिला." दिल्ली एम्समध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, डॉक्टरांनी संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचू नये म्हणून डोळा काढणे अनिवार्य असल्याचे सांगितले.
प्रशासनाकडून कडक कारवाई
ही घटना उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोरखपूरचे जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनी तात्काळ प्रभावाने संबंधित हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश झा यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ऑपरेशन थिएटरची सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी करण्यात आली असून मॅजिस्ट्रेट स्तरावरही चौकशी सुरू आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे जबाब नोंदवण्यात येत असून, अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.