मायावतींनी दाखवला बाहेरचा रस्ता, आता 'या' पक्षाने आकाश आनंदला दिली मोठी ऑफर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 22:07 IST2025-03-06T22:01:23+5:302025-03-06T22:07:20+5:30
Congress Offers Akash Anand: मायावतींनी तीन दिवसांपूर्वीच त्यांचा भाचा आकाश आनंदची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मायावतींनी दाखवला बाहेरचा रस्ता, आता 'या' पक्षाने आकाश आनंदला दिली मोठी ऑफर...
Congress Offers Akash Anand: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती यांनी आपला भाचा आकाश आनंदला पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर आता बसपातील अंतर्गत राजकीय कुरघोडीकडे काँग्रेस संधी म्हणून पाहत आहे. मायावतींवर बसपचे भाजपीकरण केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते उदित राज यांनी आकाश आनंदला काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे.
उदित राज म्हणाले, सामाजिक चळवळीतून जन्माला आलेल्या बसपचे भाजपीकरण झाले आहे. 2022 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप जिंकला तरी चालेल, पण समाजवादी पक्ष जिंकू नये, असे आवाहन मायावतींनी केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका दाखवल्याने त्यांना 24 तासांच्या आत समन्वयक पदावरून हटवण्यात आले.
मायावतींवर तपास यंत्रणांचा दबाव आहे, त्यामुळेच त्यांनी आकाश आनंदला दोनदा राष्ट्रीय समन्वयकपदावरुन हटवले आणि आता पक्षातून हकालपट्टी केली. आकाश आनंदला काँग्रेसमध्ये यायचे असेल, तर त्यांचे स्वागत आहे. ते तयार असतील, तर मी त्यांची राहुल गांधींशी ओळख करून देईन. राहुल गांधी दलित आणि मागासवर्गीयांबद्दल बोलतात, त्यामुळे बसपचे सामान्य कार्यकर्ते आणि समर्थक हळूहळू काँग्रेसकडे वळत आहेत, असा दावाही उदित राज यांनी केला.