मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या मौलानानं हात जोडून मागीतली माफी, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:58 IST2026-03-31T16:57:41+5:302026-03-31T16:58:22+5:30
"माझ्याकडून गुन्हा घडला, मी तो कबूल करतो, यापुढे अशी चूक होणार नाही," असे म्हणत मौलानाने माफी मागीतली....

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या मौलानानं हात जोडून मागीतली माफी, काय म्हणाला?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मौलाना अब्दुल्ला सलीमला अखेर युपी एसटीएफने बिहारच्या पूर्णिया येथून अटक केली. अटकेनंतर मौलानाला उत्तर प्रदेशात आणण्यात आले. अटकेनंतर मौलानाने आपल्या विधानासंदर्भात हात जोडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागितली आहे. "माझ्याकडून गुन्हा घडला, मी तो कबूल करतो, यापुढे अशी चूक होणार नाही," असे म्हणत मौलानाने माफी मागीतली आहे.
काय म्हणाला मौलाना सलीम?
माफी मागत असताना मौलाना अब्दुल्ला सलीम म्हणाला, "भागलपूरमध्ये एका कॉन्फरन्समध्ये भाषण देताना माझ्या तोंडून मुख्यमंत्री योगींच्या मातोश्रींसंदर्भात काही अत्यंत घाणेरडे शब्द निघाले, जे निघायला नको होते. मी हात जोडून माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. भविष्यात माझ्याकडून अशी चूक कधीही होणार नाही. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की, आपल्या भाषणात असे काहीही बोलू नका, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या किंवा धर्माच्या भावना दुखावतील आणि सामाजिक वातावरण बिघडेल. मुख्यमंत्री योगींना माझ्या भाषणामुळे जे दुःख झाले आहे, त्यासाठी मी त्यांची माफी मागतो."
नेमके प्रकरण काय? -
मूळचा बिहारच्या अररिया जोकीहाटचा रहिवासी असलेल्या मौलाना सलीमचे एमआयएम (AIMIM) पक्षाशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आई, गोमाता आणि उत्तर प्रदेशातील गोहत्या विरोधी कायद्यासंदर्भात भडकाऊ विधान केले होते. या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील ८३ पेक्षा जास्त पोलीस ठाण्यांमध्ये मौलानाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर एसटीएफने सोमवारी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.