जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 22:27 IST2025-09-02T22:27:22+5:302025-09-02T22:27:47+5:30
Delhi, Punjab Flood: अनेक ठिकाणी पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात हाहाकार उडालेला आहे. पंजाबमध्ये पुरात अनेक पाळीव प्राणी बुडाले आहेत. दिल्लीसह एनसीआर, गाझियाबादमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हजारो वाहने पाण्यात अडकली आहेत. रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. अशा परिस्थितीत उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने लाखो सोसायट्यांची वीज आणि पाण्याचे हाल होणार आहेत.
अनेक ठिकाणी पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथेही मुसळधार पावसामुळे रस्ते पाणी साचण्याचे आणि भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ३ सप्टेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रे आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहतील.
पावसामुळे यमुनेतील पाण्याची पातळी वाढली आहे. गाझियाबादसह नोएडालाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक इमारतींची वीज जाऊ शकते. पंजाबमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. पंजाबमधील १० हून अधिक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. येत्या काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला आहे. काश्मीरमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.