एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:41 IST2025-05-20T13:41:10+5:302025-05-20T13:41:33+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे माजी पर्यटनमंत्री आणि कुक्षी मंतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे एका गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप
मध्य प्रदेशचे माजी पर्यटनमंत्री आणि कुक्षी मंतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे एका गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र सिंह बघेल यांचे धाकटे भाऊ देवेंद्र सिंह बघेल यांची पत्नी काम्या सिंह हिने भोपाळमधील महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आमदार सुरेंद्र सिंह बघेल, त्यांची पत्नी शिल्पा सिंह बघेल, सासू चंद्रकुमारी सिंह, बहीण शितल सिंह आणि पती देवेंद्र सिंह बघेल यांच्या नावाचा समावेश आहे.
काम्या सिंह हिने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने सांगितले की, हुंड्यामध्ये लक्झरी कार न दिल्याने मला मारहाण करण्यात आली. तसेच मला लग्नाआधी खोटी माहिती देऊन लग्न लावण्यात आलं. माझे होणारे पती देवेंद्र सिंह बघेल हे एमबीए उत्तीर्ण असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते केवळ आठवीच शिकले असल्याचे लग्नानंतर समोर आले, असा आरोप तिने केला.
या प्रकरणी भादंवि कलम ८५, ३५१ (२), ३(५) आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ३ आणि ४ अन्वये भोपाळमधील महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे कमलनाथ सरकार यांच्या सरकारमध्ये मध्य प्रदेशचे पर्यटनमंत्री होते. दरम्यान, कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या गुन्ह्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.