काळा दिन: बेळगावात दबाव झुगारून मराठी भाषिक रस्त्यावर, महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:10 PM2023-11-02T12:10:21+5:302023-11-02T12:35:44+5:30

चौथी पिढी लढ्यात सक्रिय

Marathi speaking people in the border areas including Belgaum observed black day by shutting down business | काळा दिन: बेळगावात दबाव झुगारून मराठी भाषिक रस्त्यावर, महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार

काळा दिन: बेळगावात दबाव झुगारून मराठी भाषिक रस्त्यावर, महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार

बेळगाव : भाषावार प्रांतरचनेमध्ये बेळगावसह सीमावासीयांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सीमा भागातील मराठी भाषिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून बुधवारी काळा दिन पाळला. त्याचप्रमाणे केंद्र सरकारविरुद्ध एल्गार पुकारताना पोलिस प्रशासनाची दडपशाही झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहरातील विराट मूक निषेध सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन पुन्हा महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार केला.

निषेध फेरीसाठी संभाजी उद्यान मैदानात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. गोवावेस सर्कलमार्गे या सायकल फेरीची रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे सांगता झाली. निषेध फेरीत आबालवृद्धांसह विशेष करून महिलांचा सहभाग लक्षणीय होता. काळ्या रंगाचे कपडे आणि टोप्या परिधान करून काळ्या ध्वजासह निषेध फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले समिती कार्यकर्ते व युवावर्ग साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. बेळगाव- कारवार- निपाणी- बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में, अशा घोषणा देत सायकल फेरीचा मार्ग दणाणून सोडला होता.

सीमाभागातील मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि लिपी नष्ट करण्याचा कुटील डाव कर्नाटक सरकारने आखला आहे, याविरोधात महाराष्ट्रकडून मदत मिळत नसल्याची खंत माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केली.

चौथी पिढी लढ्यात सक्रिय

१९५६ पासून बेळगावात १ नोव्हेंबरला मराठी भाषिक राज्य आणि केद्रांच्या विरोधात आंदोलन करत आलाय. गेल्या काही वर्षात सीमालढ्याची धार कमी झाल्याचा आरोप होत असताना बुधवारी सायकल फेरीत मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले होते. सीमालढा चौथ्या पिढीने हातात घेतला असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सल्लागार बनून काम करू युवकांच्या हातात लढा देऊ, अशी भूमिका सभेत बोलून दाखवली होती.

केवळ विजय देवणे यांचे सीमेवर आंदोलन

सीमा समन्वयक मंत्र्यांसह बेळगावातील काळ्या दिनाकडे बहुतांश महाराष्ट्रातील नेत्यांनी पाठ फिरवली. जिल्हा बंदीचा आदेश कारण सांगत सीमालढ्याकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. केवळ विजय देवणे यांनी आंदोलन केले.

शेवटच्या क्षणी काळ्या दिनासाठी परवानगी देणारे बेळगावच्या पोलिस प्रशासनाने कोणतीच लेखी परवानगी दिली नाही, त्यामुळे लोकशाही मार्गाने पार पडलेल्या सायकल फेरीनंतर पोलिस समिती नेत्यांवर गुन्हे घालणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

Web Title: Marathi speaking people in the border areas including Belgaum observed black day by shutting down business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.