Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 23:45 IST2025-10-28T23:41:56+5:302025-10-28T23:45:27+5:30
Mantha Cyclone Live News: मोंथा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. वादळ जमिनीवर येण्यास सुरुवात झाली असून, पूर्णपणे जमिनीवर येण्यास ३ ते ४ तास लागण्याचा अंदाज आहे.

Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
Mantha Cyclone live Update: पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतितास १०० किमी इतक्या प्रचंड वेगाने वादळ जमिनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे वादळ प्रभावित भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्याने दाणादाण उडाली आहे. चक्रीवादळामुळे बुधवारी महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम दरम्यान समुद्र किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळ धडकले. वादळाचा धोका लक्षात घेऊन अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. या भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केलेल्या असून, मोंथा चक्रीवादळ जमिनीवर येण्यास सुरूवात झाल्यानंतर प्रचंड पाऊस सुरू झाला आहे.
लॅण्डफॉल सुरू, प्रतितास १०० ते ११० किमी इतका वेग
मोंथा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आले असून, प्रतितास १०० ते ११० किमी इतक्या वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा अंदाज असून, समुद्रातही उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून, वादळ उतरले तेव्हा वारा आणि पावसाचा जोर वाढला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब आणि घरांचेही नुकसान झाले आहे.
मोंथा चक्रीवादळ जमिनीला धडकले, आता पुढे काय होणार?
आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम दरम्यानच्या भूभागावर हे वादळ धडकले आहे. आता हळूहळू ते पुढे सरकत आहे. मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागावरही होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातून हे वाद पुढे जाणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही चक्रीवादळामुळे पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
दक्षिण बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगना, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, पुरूलिया, पूर्व आणि पश्चिम वर्धमान, बीरभूम आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.