व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाला दिला नकार; तरुणाने विवाहितेवर चाकूने वार करुन फेकलं ॲसिड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 20:40 IST2025-02-15T20:38:22+5:302025-02-15T20:40:13+5:30
आंध्र प्रदेशात आरोपीने एका तरुणीवर अनेक वेळा चाकूने वार करून तिच्यावर ॲसिड हल्ला केला

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाला दिला नकार; तरुणाने विवाहितेवर चाकूने वार करुन फेकलं ॲसिड
Crime News: आंध्र प्रदेशात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने माथेफिरू तरुणाने तरुणीसोबत धक्कादायक कृत्य केलं. संतापलेल्या तरुणाने आधी तरुणीवर चाकूने हल्ला केला आणि नंतर तिच्यावर ॲसिड फेकले. या भयानक घटनेनंतर तरुणीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित मुलगी पदवीधर असून आरोपी हा वर्गमित्र असल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
अन्नमय्या जिल्ह्यातील गुरमकोंडा मंडलच्या पेरामपल्ली भागात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकार पीडितेसाठी सर्वोत्कृष्ट आणि सर्व शक्य उपचार देण्याचा प्रयत्न करेल आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण पाठिंबा देईल, असं मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं.
"मानव संसाधन आणि आयटी मंत्री नारा लोकश यांनी पीडितेच्या वडिलांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. मी माझ्या बहिणीच्या बरे होण्यासाठी सर्वोत्तम उपचारांची सोय करणार आहे. मी माझ्या बहिणीसोबत उभा आहे. ॲसिड हल्ल्याच्या या घटनेने मला खूप दुःख झालं आहे. हल्लेखोराला कठोर शिक्षा होईल. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही," असं मंत्र्यंनी म्हटलं.
नारा लोकेश यांनी रूग्णालयात असलेल्या मंत्री मंडुपल्ली रामप्रसाद यांच्याशी समन्वय साधला आणि पीडितेच्या उपचारावर लक्ष ठेवण्याच्या आणि आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात असे गुन्हे घडू नयेत यासाठी कायदा यंत्रणांनी कठोर कारवाई करण्याचे आवाहन लोकेश यांनी केले.
अन्नमय्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बी. कृष्णा राव यांनी या प्रकरणाची माहिती दिली. मदनपल्ले येथील रहिवासी गणेश (२४) याने शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गुर्रमकोंडा मंडलातील पेरामपल्ली गावात मुलीवर हल्ला केला. त्यावेळी तिचे आई-वडील गुरे चवण्यासाठी गेले होते. मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे आणि तिने गणेशला सांगितले होते की तिला आता त्याच्याशी संबंध ठेवायचे नाहीत. मुलीने गणेशला सकाळी बोलण्यासाठी घरी बोलावले होते.
गणेश सर्व तयारी करुन मुलीला भेटायला गेला आणि भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. गणेशने तिच्यावर चाकूने वार केले आणि नंतर ॲसिडने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.