७ वर्षाच्या लेकीने विचारलेल्या प्रश्नाने संतापला बाप; मुलीसह तिघांची हत्या केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:31 IST2025-04-02T15:25:36+5:302025-04-02T15:31:35+5:30
कर्नाटकात पित्यानेच मुलीसह तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

७ वर्षाच्या लेकीने विचारलेल्या प्रश्नाने संतापला बाप; मुलीसह तिघांची हत्या केली अन्...
Karnatak Crime:कर्नाटकाच्या चिक्कमगालुरूमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या सात वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने स्वतःलाही संपवलं. आरोपीने मेहणीच्या पतीवर हल्ला केला मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून मुलीने विचारलेल्या एका प्रश्नानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं.
कर्नाटकातील चिक्कमगालुरू जिल्ह्यातील मगलु गावात ही धक्कादायक घटना घडली. रत्नाकर गौडा (४०) असे आरोपीचे नाव असून तो मगलुपासून जवळच्या किथलीकोंडा गावात राहत होता. मंगळवारी रात्री त्याने सात वर्षांची मुलगी, सासू ज्योती (५०) आणि मेहुणी सिंधू (२४) यांची हत्या केली. या हल्ल्यात सिंधूचा पती अविनाश (२८) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आत्महत्येपूर्वी रत्नाकरने चिठ्ठी लिहीत आत्महत्येचे कारण सांगितले. बालेहोन्नूर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर आणि त्याची पत्नी स्वातीचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने दोघेही वेगळे राहत होता. ज्यामुळे रत्नाकर तणावात होता. स्वाती कामासाठी मंगळुरूला स्थलांतरित झाली होती, तर रत्नाकर स्थानिक शाळेत बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ही घटना घडली त्यावेळी स्वाती घरी नव्हती. रत्नाकरने त्याच्या सासूशी झालेल्या भांडणानंतर चौघांवर हल्ला केला ज्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःचा जीव घेण्यासाठी बंदुकीचा वापर केला.
कौटुंबिक कलहाला कंटाळून आरोपीने हे पाऊल उचलल्याचे चिक्कमगलुरूचे पोलीस अधीक्षक विक्रम आमटे यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, रत्नाकरची मुलगी मंगळवारी शाळेतून परतली तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिच्या आईबद्दल विचारले. शाळेतील मित्रांनी तिला तिच्या आईबद्दल प्रश्न विचारले होते. घरी येऊन मुलीचे प्रश्न ऐकून रत्नाकर अस्वस्थ झाला. त्याने रागाच्या भरात सासरचे घर गाठून त्यांच्यावर हल्ला केला.
"माझ्या प्रिय मित्रांनो, कुटुंबातील सदस्यांनो, मला सांगायचं आहे की मी माझा निर्णय घेतला आहे. माझ्या पत्नीने मला फसवले आणि दोन वर्षांपूर्वी मला सोडून दिले. तिने तिच्या मुलीलाही सोडून दिले, जिची मी काळजी घेत होतो. माझे जीवन, माझा आनंद, तिचे प्रेम सगळं काही संपले. माझ्या मुलीचे वर्गमित्र तिला तिची आई कुठे आहे असे विचारत राहतात. तिने एकदा माझ्या नकळत अल्बममधून फोटो काढला आणि तिच्या आईचा फोटो तिच्या वर्गमित्रांना दाखवला. तिच्या आईबद्दल वारंवार विचारलं जात असल्याने तिला खूप वाईट वाटते," असं रत्नाकरने चिठ्ठीत म्हटलं.