घरातील महिलांचे दागिने विकून 70 बोटी विकत घेतल्या अन् महाकुंभात केली 30 कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:07 IST2025-03-05T19:07:27+5:302025-03-05T19:07:34+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी विधानसभेत सांगितली या अवलियाची कहाणी...

घरातील महिलांचे दागिने विकून 70 बोटी विकत घेतल्या अन् महाकुंभात केली 30 कोटींची कमाई
Mahakumbh 2025 : अंगात जिद्द असेल, तर यशाची शिखरे पादांक्रत करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभातून अनेक यशोगाथा समोर येत आहे, ज्या ऐकून तुम्हीदेखील अवाक व्हाल. या महाकुंभ सोहळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली.
महाकुंभ फक्त एक धार्मिक आयोजन नव्हते, तर अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. महाकुंभात युपीसह देशभरातील अनेकांनी लहान-मोठे व्यवसाय करुन हजारो-लाखोंची कमाई केली. काहींनी तर कोट्यवधी रुपये कमावले. सध्या एका अशा व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे, ज्याने महाकुंभात 45 दिवस बोट चालवून तब्बल 30 कोटी रुपये कमावले. सीएम योगी आदित्यनाथ यांनी स्वतः विधानसभेत या व्यक्तीची यशोगाथा सर्वांसमोर मांडली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी विधानसभेत अनेकांची उदाहरणे दिली, ज्यांना या महाकुंभामुळे खूप मोठा आर्थिक लाभ झाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, या महाकुंभाने त्रिवेणीच्या काठावर वसलेल्या अराइल गावात राहणाऱ्या पिंटू मेहरा यांचे आयुष्यच बदलून गेले. पिंटू यांनी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी घरातील महिलांचे दागिने विकून आणि जमीन गहान ठेवून 70 बोटी विकत घेतल्या होत्या.
पिंटू सांगतात की, नौकाविहार हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. यापूर्वी झालेल्या अर्धकुंभात प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे यंदाही गर्दी होणार, असा त्यांना अंदाज आला होता. यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबाचे सर्वस्व पणाला लावले आणि 70 बोटी विकत घेतल्या. त्यांच्या कुटुंबात शंभरहून अधिक लोक असून, या सर्वांना त्यांनी कामावा लावले. महाकुंभ 45 दिवस चालला आणि या काळात पिंटू यांच्या कुटुंबाने बोट चालवून तब्बल 30 कोटी रुपयांची कमाई केली. या देदिप्यमान यशामुळे पिंटू यांची सर्वत्र चर्चा होत आहे.