आधी भारताबद्दल अपशब्द वापरले, पोलिसांनी कारवाई करताच दिल्या 'हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 19:31 IST2021-10-28T19:30:52+5:302021-10-28T19:31:00+5:30
भारताबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील जौनपुरच्या एका तरुणाविरोधात कारवाई केली आहे.

आधी भारताबद्दल अपशब्द वापरले, पोलिसांनी कारवाई करताच दिल्या 'हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा...
जौनपूर:उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका तरुणाने आधी भारताबद्दल अपशब्द वापरले, त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आता त्या तरुणाने माफी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूरमध्ये एका मुस्लिम तरुणाने भारताचा अपमान करणारा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि ही बाब पोलिसांच्याही निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत तरुणाला अटक केली. आता तरूणाविरुद्ध योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तरुणाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि हिंदुस्थान जिंदाबादचा नाराही दिला.
नेमकं काय घडलं
जौनपूरच्या मच्छलीशहरचा रहिवासी नसीमने देशावर अशोभनीय टिप्पणी करणारा व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला. यानंतर पोलिसांनी तरुणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस आता तरुणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, तरुणाने आपली चूक मान्य केली आणि व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर माफीही मागितली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, त्या तरुणाला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.