शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'त्यानं' शरीरावर गोंदवले 591 टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:11 PM2019-02-19T14:11:43+5:302019-02-19T15:18:54+5:30

दिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. तरुणाने स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदवले आहेत.

man with army martyrs tattooed on body plans to visit the families | शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'त्यानं' शरीरावर गोंदवले 591 टॅटू

शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'त्यानं' शरीरावर गोंदवले 591 टॅटू

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.तरुणाने स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदवले आहेत.अभिषेक गौतम असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव असून तो इंटिरिअर डिझायनर आहे.

नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. तरुणाने स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदवले आहेत. अभिषेक गौतम असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव असून तो इंटिरिअर डिझायनर आहे. कारगील युद्धात वीरमरण आलेल्या 559 सैनिकांची नावं आणि काही थोर व्यक्तींच्या प्रतिमा असे 591 टॅटू काढले आहेत.

अभिषेकला हे टॅटू गोंदवण्यासाठी आठ दिवस लागले. तसेच जूनपासून तो त्याच्या बाईकवरून देशभर तब्बल 15 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या प्रवासात प्रत्येक दिवशी एका शहीद जवानाच्या कुटुंबीयांची तो  भेट घेणार आहे. अभिषेक 24 ते 26 जुलै दरम्यान कारगीलमध्ये असणार आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. या हल्लाबाबत अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. 'मला ठावूक आहे की अनेकांना युद्ध हवे आहे, पण युद्ध हा उपाय नव्हे. खूप लोक युद्धात मारले जातील. आपण नंतर ते विसरून जाऊ मात्र शहिदांच्या कुटुंबीयांना त्याचा सामना करावा लागेल' असे अभिषेकने म्हटले आहे.


दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे.  दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे. 




Web Title: man with army martyrs tattooed on body plans to visit the families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.