'आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या नसाल...' SIR विरोधी सभेतून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:48 IST2025-12-03T15:47:48+5:302025-12-03T15:48:40+5:30
'मी असेपर्यंत एकही बंगाली डिटेन्शन कॅम्प किंवा बांग्लादेशात पाठवला जाणार नाही.'

'आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या नसाल...' SIR विरोधी सभेतून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Mamata Banerjee on SIR : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मालदा जिल्ह्यातील गाझोल येथे आयोजित SIR विरोधी रॅलीमध्ये केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी केंद्राच्या धोरणांपासून ते स्थानिक समस्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आणि नागरिकत्वाशी संबंधित भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ममता म्हणाल्या, 'घाबरू नका, मी असेपर्यंत एकही बंगाली ना डिटेन्शन कॅम्पमध्ये जाईल, ना बांग्लादेशात पाठवला जाईल.'
आज तुम्ही सत्तेत आहात, पण...
ममता बॅनर्जी पुढे म्हणतात, केंद्र सरकार राज्याला हक्काचा निधी देत नाही. GST नंतर आता सिगारेटचा करही केंद्र स्वतःकडे ठेवणार अशी माहिती आहे. राज्याने केंद्राकडे प्रकल्प पाठवले, मात्र निधी मिळत नाही. त्यांनी देशावर पूर्ण कब्जा केला आहे. हे आणीबाणीसारखेच आहे. आज तुम्ही सत्तेत आहात, पण उद्या नसाल. BJP निधी अडवून आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही मागे हटणार नाही.
बीएलओंच्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित
सीएम बॅनर्जी यांनी अनेक राज्यांमधील बीएलओंच्या मृत्यूंचा प्रश्न उचलला. त्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात 9, तर उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि बंगालमध्येही बीएलओंच्या मृत्यूच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. लोकांना यातना सोसाव्या लागत आहेत. निवडणुकीपूर्वी इतकी घाई का? SIR प्रक्रियेवर नागरिकांमध्ये वाढत्या चिंतेवर ममता म्हणाल्या की, अनेक सर्व्हर बंद आहेत आणि लोकांना धमक्या दिल्या जात आहेत.
आम्हाला भाजपकडून हिंदुत्व शिकायची गरज नाही
सभेत ममता बॅनर्जी यांनी धर्म आणि सांप्रदायिकतेचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर आरोप केला की, ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी केंद्राच्या वक्फ कायद्याचा विरोध असल्याचे सांगितले आणि म्हटले की, धार्मिक स्थळांवर हात घालू देणार नाही. बांग्ला बोलणाऱ्यांना बांग्लादेशी म्हणणे म्हणजे अपमान आहे. SIR पासून घाबरू नका. गृह मंत्री अमित शाह यांची ही चाल आहे, पण ते यशस्वी होणार नाही. मी आहे तोपर्यंत तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ देणार नाही, असेही ममता यावेळी म्हणाल्या.