ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 07:26 AM2024-01-25T07:26:44+5:302024-01-25T07:27:28+5:30

पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढणार तृणमूल काँग्रेस

Mamata Banerjee has announced that she has decided to contest the upcoming Lok Sabha elections alone in the state. | ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बुधवारी जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिल्याने विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता. पण, त्यांनी तो नाकारला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस आणि टीएमसी यांच्यातील जागावाटपाच्या वादात बॅनर्जी म्हणाल्या. जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेसमधील कोणाशीही बोलले नाही. पक्षाचा राज्यात काँग्रेसशी कोणताही संबंध नाही, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. टीएमसीने २०१९च्या लोकसभा  निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे काँग्रेसला २ जागांची ऑफर दिल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला. माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी, काँग्रेस आणि टीएमसी हे २८ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. 

भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण नाही : ममता 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आम्हाला निमंत्रण देण्यात आले नाही. या आरोपानंतर काँग्रेसने म्हटले आहे की, १३ जानेवारी रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे ममता बॅनर्जी यांना भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण दिले होते.  राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतही तसा उल्लेख केला होता.

आम्ही स्वबळावर लढू : अधीर रंजन चौधरी
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.

पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्पष्ट केले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढेल. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोघांचेही मत आहे की, सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने आघाडीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पंजाबमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. केरळमध्येही अशीच स्थिती डावे आणि काँग्रेसची आहे. तिथे डावे पक्ष सत्तेत आणि काँग्रेस विरोधात आहे.

Web Title: Mamata Banerjee has announced that she has decided to contest the upcoming Lok Sabha elections alone in the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.