पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:30 IST2025-12-04T12:29:32+5:302025-12-04T12:30:36+5:30
Humayun Kabir Babri Masjid : आमदार हुमायूं कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षविरोधी आणि वादाला जन्म देणारे ठरले. या घोषणेमुळे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
तृणमूल काँग्रेस पक्षाचे मुर्शिदाबाद येथील आमदार हुमायूं कबीर यांना पक्षाने तातडीने निलंबित केले आहे. पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा, हे या कारवाईचे मुख्य कारण आहे. कबीर यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फिरहाद हकीम यांनी आमदाराच्या निलंबनाची बातमी अधिकृतपणे जाहीर केली. "मुर्शिदाबादच्या आमच्या एका आमदाराने अचानक बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली. बाबरी मशीद कशासाठी? यापूर्वीही त्यांना ताकीद देण्यात आली होती," असे हकीम यांनी स्पष्ट केले.
तसेच हुमायूं बाबरी मशीद का बांधेल? जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील तर दुसरे काही का बांधू नये? बाबरी मशीदीच्या प्रचारामागे भाजपचा हात आहे. हुमायून राजनगरमध्ये राहतो आणि भरतपूरचा आमदार आहे. बेलडांगामध्ये जाणूनबुजून दंगली घडवण्याचा कट रचला जात आहे, असाही आरोप हकीम यांनी केला आहे.
या कारवाईवर हुमायूं यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुर्शिदाबादमध्ये एक रॅली आणि सभा घेणार आहेत. मला बोलावून अपमानित करण्यात आले आहे. यामागे एक कट आहे. मी बाबरी मशीद बांधेन. मी उद्या पक्षाचा राजीनामा देईन. शिवाय, मी २२ तारखेला नवीन पक्ष स्थापनेची घोषणा करेन, अशी घोषणा केली आहे.
आमदार हुमायूं कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षविरोधी आणि वादाला जन्म देणारे ठरले. या घोषणेमुळे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची तीव्र नाराजी झाल्याचे समजते. पक्षाने कोणत्याही वादग्रस्त धार्मिक मुद्यांपासून दूर राहण्याचा आणि आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या भूमिकेचा भाग म्हणून कबीर यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.