"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:56 PM2024-06-24T12:56:36+5:302024-06-24T12:57:26+5:30

सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत.

mallikarjun kharge retort on pm modi  25 june statement said unsaid emergency has been imposed in the country | "आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर आणि यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत. ही शपथ राज्यनिहाय खासदारांना दिली जात आहे. 

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे खासदारांना शपथ देत आहेत. दरम्यान, विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन निषेध केला.याचबरोबर, लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून इंडिया आघाडीचे खासदार नाराज आहेत. याबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, संसदेच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष हा मुद्दा कधीच नव्हता. आम्ही संविधान आणि नियमानुसार काम करतो. सर्व सदस्यांनी मिळून संसद चालवायची आहे. 

२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी सहकार्याचे आवाहन करताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोठं विधान केले आहे.

संसदेबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान किती दिवस हे बोलत राहतील, कुणास ठाऊक. त्यांच्याकडे आणीबाणीशिवाय बोलायला काहीच नाही. जे होते, ते घोषित केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, ती अनसेड इमर्जन्सी (अघोषित आणीबाणी) आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जनता आमच्यासोबत आहे, पण मोदीजींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज येथे आंदोलन करत आहोत.प्रत्येक लोकशाही नियम मोडला जात आहे, म्हणूनच आज आम्ही मोदीजींना संविधानाचे पालन करण्यास सांगत आहोत. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
विरोधकांवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, "उद्या २५ जून आहे. ५० वर्षांपूर्वी याच दिवशी संविधानावर काळा डाग लागला होता. अशी काळ देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांची भारतातील लोकशाही परंपरांवर निष्ठा आहे. त्यांच्यासाठी २५ जून हा दिवस अविस्मरणीय आहे. राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवी पिढी कधीही विसरणार नाही. भारताचे तुरुंगात रूपांतर झाले. लोकशाही पूर्णपणे दाबली गेली. आणीबाणीची ही ५० वर्षे ही प्रतिज्ञा आहे की आपण आपल्या राज्यघटनेचे रक्षण करू आणि भारताच्या लोकशाही परंपरांचे रक्षण करू, तर देशवासीय संकल्प करतील की भारतात पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत कोणीही करणार नाही."

Web Title: mallikarjun kharge retort on pm modi  25 june statement said unsaid emergency has been imposed in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.