रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:50 PM2024-04-02T21:50:56+5:302024-04-02T21:51:29+5:30

'काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करणार.'

Mallikarjun Kharge attacked government over the state of indian railways | रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

नवी दिल्ली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी रेल्वेच्या दुरवस्थेवरुन भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने रेल्वेची आर्थिक हानी केली, रेल्वेची सुरक्षा, सामर्थ्य आणि कार्यक्षमता नष्ट करुन रेल्वेची नासधूस केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणतात, नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे उद्ध्वस्त झाली. सरकारने रेल्वे गाड्यांना स्वतःच्या प्रचाराचे साधन बनवले. रेल्वे आजही करोडो भारतीयांची जीवनवाहिनी आहे, पण मोदींच्या राजवटीत तिची अवस्था बिकट होत आहे. CAG-2023 चा हवाला देऊन ते म्हणाले की, वेळेवर धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या 2012-13 मधील 79 टक्क्यांवरून 2018-19 मध्ये 69.23 टक्क्यांवर आली. 58,459 कोटी रुपयांपैकी केवळ 0.7 टक्के निधी ट्रॅकच्या नूतनीकरणासाठी खर्च केला जातो. यामुळेच वंदे भारत हायस्पीड ट्रेनचा सरासरी वेग ताशी 180 किमी ऐवजी केवळ 83 किमी प्रतितास आहे.

2031 पर्यंत 750 रेल्वे स्थानकांपैकी 30 टक्के आणि सर्व मालगाड्यांचे खाजगीकरण केले जाणार. सर्व नफा कमावणाऱ्या एसी कोचचेही खाजगीकरण केले जाईल. रेल्वेकडे फक्त तोट्यात असलेल्या द्वितीय श्रेणीच्या प्रवासी गाड्या उरल्या आहेत, असा दावाही खर्गेंनी यावेळी केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारला सात प्रश्नही विचारले.

  1. भाजप सरकारने रेल्वेतील 3 लाखांहून अधिक रिक्त जागा का भरल्या नाहीत? 
  2. प्रति किलोमीटर प्रति प्रवासी सरासरी भाडे 2013-14 (UPA) मधील 0.32 वरुन 2023 मध्ये 0.66 पैसे का झाले?
  3. 2017 ते 2021 दरम्यान ट्रेनशी संबंधित 100,000 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले, हे खरे नाही का? 
  4. कोव्हिड महामारीच्या काळात मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठीच्या सवलती का रद्द केल्या?
  5. CAG नुसार, ₹58,459 कोटींपैकी फक्त 0.7% निधी ट्रॅक नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आला. का?
  6. रेल्वे अर्थसंकल्प विलीन करुन मागच्या दाराने निधी कमी करण्याच्या हालचाली झाल्या, हे खरे नाही का?
  7. मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाची एक भव्य योजना सुरू केली आणि वाढीव खाजगीकरण आधीच सुरू झाले, हे खरे नाही का? असे प्रश्न खर्गे यांनी मोदी सरकारला विचारले.

Web Title: Mallikarjun Kharge attacked government over the state of indian railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.