Air Vistara वर DGCA ची मोठी कारवाई; 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला, 'हे' आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:26 IST2023-02-06T15:26:31+5:302023-02-06T15:26:38+5:30
मागील काही काळापासून DGCA विमान कंपन्यांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे.

Air Vistara वर DGCA ची मोठी कारवाई; 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला, 'हे' आहे कारण...
नवी दिल्ली- मागील काही काळापासून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA विमान कंपन्यांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे. यातच आता डीजीसीएने एअर विस्तारा (Air Vistara) या विमान कंपनीला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ईशान्येकडील भागात कमी उड्डाणे केल्याबद्दल एअर विस्तारावर ही दंडात्मक कारवाई झाली आहे. DGCA च्या म्हणण्यानुसार, विमान कंपनीने दंडही भरला आहे. विमान कंपनीच्या वतीने नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ऑक्टोबर 2022 मध्ये हा दंड ठोठावण्यात आला होता.
एप्रिल 2022 साठी विस्ताराचे उपलब्ध सीट किलोमीटर्स 0.99 टक्के आढळले, जे ईशान्येकडील मार्गांवर अनिवार्य 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामुळे ही दंडात्मक कारवाई झाली आहे. या कारवाईबाबत उत्तर देताना विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, “विस्तारा गेल्या अनेक वर्षांपासून RDG (रूट डिस्पर्सल गाइडलाइन्स) चे पूर्णपणे पालन करत आहे. आम्ही RDG नियमात विहित केल्यानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आवश्यक ASKM पेक्षा जास्त उड्डाणे सातत्याने तैनात करत आहोत.”
पण, प्रवक्त्याने कबूल केले की बागडोगरा विमानतळ बंद झाल्यामुळे काही उड्डाणे रद्द कराव्या लागल्या. एप्रिल 2022 मध्ये आवश्यक असलेल्या फ्लाइट्सची संख्या केवळ 0.01 टक्क्यांनी कमी झाली. दरम्यान, एअरलाइन कंपन्यांना प्रत्येक सेक्टरमधील किमान फ्लाइट्सची माहिती दिली जाते. एअर विस्ताराने डीजीसीएच्या या नियमाकडे दुर्लक्ष केले. एअर विस्ताराने ईशान्येकडील प्रदेशात जेवढी किमान उड्डाणे करायला हवे होते, त्यापेक्षा कमी उड्डाणे केली आहेत. याआधी डीजीसीएने एअर इंडियालाही 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र एअर इंडियाच्या प्रवाशाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.