दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:06 IST2025-11-24T17:06:22+5:302025-11-24T17:06:31+5:30
सध्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) रविवारी दुपारी एक गंभीर दुर्घटना टळली. काबुलहून आलेल्या एरियाना अफगाण एअरलाइन्सच्या फ्लाइट FG 311 ने चुकून त्या रनवेवर लँडिंग केली, जो फक्त टेक-ऑफसाठी (Departures) वापरले जाते. सुदैवाने त्यावेळी रनवेवर इतर कोणते विमान नव्हते.
टेक-ऑफ रनवेवर विमानाची लँडिंग
सविस्तर माहिती अशी की, रविवारी दुपारी 12.07 वाजता अफगाणी एअरलाइन्सच्या विमानाने रनवे 29R वर लँडिंग केली. साधारणतः हा रनवे फक्त टेकऑफ करणाऱ्या विमानांसाठी राखीव असतो, तर रनवे 29L हा लँडिंगसाठी वापरला जातो. हवामान आणि ऑपरेशनल गरजेनुसार बदल केले जातात, परंतु संबंधित वेळी रनवे 29R वर कोणतेही विमान टेक ऑफसाठी रांगेत नव्हते, त्यामुळे मोठा अपघात टळला.
चूक पायलटची की ATCची?
या विमानाची लँडिंग पायलटच्या चुकूमुळे झाली की, दिल्ली ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) कडून चुकीचे निर्देश देण्यात आले होते? याचा शोध घेण्यासाठी विमानन प्राधिकरणांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. विमानतळ प्रशासन आणि DGCA ने या घटनेला उच्च-जोखीम सुरक्षा प्रकरण म्हणून नोंदवले आहे. सध्या ATC रेकॉर्डिंग, फ्लाइट डेटा आणि पायलट कम्युनिकेशन तपासले जात असून लवकरच संपूर्ण अहवाल प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.