उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील बिछवा भागातील देवगंज गावात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रीता देवी यांच्या 'बँक ऑफ इंडिया'च्या बचत खात्यात अचानक १० कोटी रुपये जमा झाले. मोबाईलवर एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने तातडीने बँक गाठून अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असून आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रीता देवी यांच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या मुलाने एटीएममध्ये बॅलेन्स तपासतानाचा एक व्हिडीओ देखील बनवला असून तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कुटुंबाने ही एखाद्या तांत्रिक चुकीची शक्यता असल्याचं मानून बँकेला याची माहिती दिली आहे.
खात्यात आले १० कोटी
मिळालेल्या माहितीनुसार, बिछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगंज येथील रहिवासी असलेल्या रीता देवी यांच्या बँक ऑफ इंडिया, सुल्तानगंज शाखेतील बचत खात्यात अचानक ९ कोटी ९९ लाख ४९ हजार ५८८ रुपये (जवळपास १० कोटी) जमा झाले. ज्यावेळी हा मेसेज आला, तेव्हा रीता देवी शेतात काम करत होत्या. यापूर्वी त्यांच्या खात्यात फक्त ४५ हजार रुपये होते. संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलासोबत एटीएममध्ये जाऊन बॅलन्स चेक केला, तेव्हा स्क्रीनवर कोट्यवधींची रक्कम पाहून त्यांना धक्का बसला.
"आम्हाला असे पैसे नकोत"
रीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सुरुवातीला आमचा मेसेजवर विश्वासच बसला नाही, पण मुलासोबत एटीएममध्ये जाऊन खात्री केल्यावर मोठा धक्का बसला. आम्हाला असे पैसे नकोत." त्यांच्या मुलानेही आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, "प्रामाणिक राहणंच चांगलं आहे. आम्हाला याची भीती वाटत आहे, बँक अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याचं निराकरण करावं."
कुटुंबाने बँकेला दिली माहिती
रीता देवी यांचं कुटुंब शेती करते. इतके पैसे पाहून घाबरलेल्या या कुटुंबाने स्वतःहून बँक अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. आता ही रक्कम एखाद्या चुकीमुळे जमा झाली आहे की यामागे दुसरं काही कारण आहे, याचा तपास बँक करत आहे. या घटनेने सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
Web Summary : An Uttar Pradesh woman found ₹10 crore in her account while working in the fields. The family, shocked by the sudden wealth, promptly informed the bank, stating they don't want the money, suspecting a technical error and requesting immediate resolution.
Web Summary : उत्तर प्रदेश की एक महिला को खेत में काम करते समय उसके खाते में ₹10 करोड़ मिले। अचानक धन से स्तब्ध परिवार ने तुरंत बैंक को सूचित किया, यह कहते हुए कि उन्हें पैसे नहीं चाहिए, तकनीकी त्रुटि का संदेह है और तत्काल समाधान का अनुरोध किया।