विद्यार्थी का उचलतायेत टोकाचं पाऊल?; दुर्दैवाने देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:47 IST2025-11-23T09:46:53+5:302025-11-23T09:47:49+5:30
दहावी व बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक

विद्यार्थी का उचलतायेत टोकाचं पाऊल?; दुर्दैवाने देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगभरात ओळख असलेला महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे. शाळा, शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे देशात विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील दहावीचा विद्यार्थी शौर्य पाटील आणि जालन्यातील आरोही बिटलानसह कितीतरी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनांमुळे देश ढवळून निघाला आहे.
राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अपघात व आत्महत्येशी संबंधित अहवालानुसार, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये देशात एकूण १३,८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यातील २,०४६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले.
आत्महत्येची कारणे
मित्रांपुढे अपमान, खच्चीकरण करणे, नापास करणे आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी, पालकांना उलटसुलट बोलणे, दुसऱ्या विद्यार्थ्याशी तुलना करणे, ड्रामेबाज म्हणणे, मासिक फी, वार्षिक फी, स्पोर्ट्स डे किंवा अन्य कार्यक्रमाचे पैसे न भरल्यास इतरांपेक्षा वेगळे दाखविणे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०१४ ते २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण ७२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०१५ मध्ये आत्महत्यांचा आकडा ९०० ते २०२० मध्ये २,१०० ने आणि २,०२३ मध्ये ८४८ ने वाढला होता.
देशातही प्रमाण वाढले
देशात २०१८ मध्ये एकूण १,३४,५१६ जणांनी आत्महत्या केली. २०२३ मध्ये हा आकडा १,७१,४१८ वर पोहोचला. यात मुंबईत (१,४१५), पुणे (९५३), नागपूर (६६३), छ. संभाजीनगर (३५४) व नाशिकमध्ये (१६०) घटना घडल्या आहेत.
उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांची टक्केवारी १७.५ टक्के
या आकडेवारीतील धक्कादायक बाब अशी की, आत्महत्या करण्यात दहावी आणि बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक २४.६ टक्के आहे. यानंतर फस्ट ईअर ते थर्ड ईअरच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १८.६ टक्के, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांची टक्केवारी १७.५ टक्के अशी आहे. विद्यार्थी आत्महत्यांना आळा घालण्यासाठी मेंटल हेल्थकेअर ॲक्ट, एन्ट्री रॅगिंग मेजर्स, असे विविध कायदे अस्तित्वात आहेत.