Maharashtra Government: Sharad pawar and PM narendra modi will meet today at 12.30 pm; Why? | महाराष्ट्रात गोंधळ, दिल्लीत भेटी; नेमके चाललेय काय? दुपारी पवार-मोदी भेट

महाराष्ट्रात गोंधळ, दिल्लीत भेटी; नेमके चाललेय काय? दुपारी पवार-मोदी भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे केंद्र आता दिल्लीकडे सरकले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खलबते सुरूच आहेत. यापासून शिवसेना अद्याप लांब आहे. असे असले तरीही दिल्लीत आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी आज दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत या बैठका मुंबईत होत होत्या. मात्र, लोकसभेच्या अधिवेशनामुळे दोन्ही पक्षांचे नेते दिल्लीत आहेत. मात्र, या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. कारण पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार आहेत. यातच पवार यांनी संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केल्याने नवे राजकीय समीकरण उदयास येते का, हे स्पष्ट होणार आहे. 


शरद पवार यांनी पत्रकारांना उत्तर देताना महाराष्ट्रातील सरकार स्थापन्याचे शिवसेना, भाजपाला विचारा असे म्हटले होते. तसेच सोनिया गांधी यांच्याशी सरकारबाबत काहीच चर्चा झाले नसल्याचेही सांगितल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. त्याच दरम्यान पवार भाजपाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचीही बातमी पसरली होती. 


लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात शरद पवारांना लक्ष्य केले होते. तसेच राष्ट्रवादीचे 30 हून अधिक आमदार फोडून त्यांना भाजपमध्ये घेतले होते. त्यामुळे पवारांविषयी राज्यात सहानुभूती निर्माण झाली होती. पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची स्तुती खुद्द मोदींनीच राज्यसभेत केली होती. पवार-मोदी सख्य सर्वांनाच माहिती आहे. 2014 मध्ये पवारांनीच फडणवीस सरकारला मूक पाठिंबा दिला होता. आता उघडपणे पाठिंबा देण्याच्या विचारात पवार नाहीत ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. आज दुपारी 12 वाजता पवार मोदींना भेटणार आहेत. 


या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मोदींच्या भेटीला नेण्याची विनंती केली होती. या सगळ्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Government: Sharad pawar and PM narendra modi will meet today at 12.30 pm; Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.