केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 07:18 IST2025-09-27T06:13:30+5:302025-09-27T07:18:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा केंद्राला लवकरच देणार अहवाल, कर्जमाफीबाबत सकारात्मक

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
नवी दिल्ली : अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार लवकरच त्याचा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. यानंतर केंद्राकडून मदतनिधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले भरीव मदतीसाठीचे निवेदन सुद्धा पंतप्रधानांना देण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार
भाजपने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार आपल्या शब्दावर कायम आहे. यासाठी समिती नेमण्यात आली असून, कर्जमाफी कधी आणि कशी द्यायची, याचा अभ्यास करीत आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. सरकार यावर काम करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात डिफेन्स इको-सिस्टीम उभी करण्याबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सादरीकरण केले. यात सध्या ६० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. कॉरिडार झाल्यावर पाच लाख कोटींपर्यंत गुंतवणूक येऊ शकते. पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर पहिला कॉरिडॉर, अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर दुसरा आणि नाशिक-धुळे असा तिसरा कॉरिडॉर असेल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
नाहक सल्ला देऊ नका, उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून मदत देण्याची मागणी केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. पीएम केअर फंडाप्रमाणे राज्यात फंड तयार करण्याची परवानगी केंद्राने दिली होती. कोविडच्या काळात तयार झालेल्या या फंडात ६०० कोटी रुपये जमा झाले. परंतु यातील एक रुपया सुद्धा खर्च न करू शकणारे तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाहक सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
८-९ ऑक्टाेबरला पंतप्रधान मुंबईत
नवी मुंबई विमानतळ, मेट्राे ३ चे उद्घाटन पंतप्रधान मोदी येत्या ८ व ९ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार आहेत. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर हे सुद्धा उपस्थित राहतील.
‘दि.बां.’चे नाव देण्यास केंद्र सरकार अनुकूल
नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-३ या प्रकल्पांचा शुभारंभ यावेळी होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार अनुकूल असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
दहिसरच्या जागेचे हस्तांतरण
दहीसर पूर्व येथील ५८ एकर जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. या जागेचे मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरण करण्याचा आधी निर्णय झाला होता. आता ही जागा मुंबई महापालिकेला देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. राज्य सरकारच्या मायनिंग कॉर्पोरेशनला खाणी मिळाल्या तर चीनपेक्षा स्वस्त स्टीलची निर्मिती गडचिरोलीत केली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पूरस्थितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली : राज्यातील अनेक जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे येत्या रविवारी (दि. २८) होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार आहे.