महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:34 AM2019-11-19T03:34:49+5:302019-11-19T06:20:17+5:30

राज्यातील सत्ताकोंडी कायम; काँग्रेसचा अंतिम निर्णय होणार दोन दिवसांनंतरच

Maharashtra elections 2019: discussions between Sharad Pawar-Sonia Gandhi are incomplete! | महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याच्या विषयावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शिवसेनेला पाठिंबा देताना काही अटी निश्चित ठेवायला हव्यात, असे सोनिया यांनी पवार यांना सांगितले. त्यामुळे सरकारच्या स्वरूपाबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत पुन्हा भेटणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.

आपल्याला सरकारमध्ये अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शिवसेनेवर राष्ट्रवादी दबाव आणत आहे. राष्ट्रवादीपेक्षा १0 आमदार कमी असलेल्या काँग्रेसलाही अधिक प्रतिनिधित्व हवे असल्याने, त्यावर दोन्ही पक्षांत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चर्चा होईल. त्यानंतर, सोनिया गांधी निर्णय घेतील.

या चर्चेमध्ये काँग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात सहभागी होतील. त्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. सोनिया गांधी शिवसेनेसोबत जाण्यास साशंक आहेत. काँग्रेसच्या आमदारांना सरकारमध्ये असावे, असे वाटते. त्यामुळे हिंदुत्ववादासारखे काही मुद्दे शिवसेनेने दूर ठेवावेत, असा काँग्रेसचा आग्रह असेल. कोणाचे किती मंत्री असावेत, मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेकडेच असावे का? उपमुख्यमंत्री किती असावेत, हे स्पष्ट झाल्यानंतरच काँग्रेस भूमिका स्पष्ट करेल.

आपल्यात एकमत होईपर्यंत कोणीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर करू नये, असे सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात ठरल्याचे समजते. बहुधा त्याचमुळे पवार यांनी आमची सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही, असे सांगितले असावे, शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील लहान पक्षांनाही सरकारमध्ये स्थान असावे आणि मुळात त्यांची भूमिका ऐकून घ्यावी, असेही या दोन नेत्यांमध्ये ठरले आहे.

पवारांच्या भेटीला संजय राऊत
सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. मात्र, त्यांनीही राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाविषयी चर्चा झाली, असेच सांगितले.

Web Title: Maharashtra elections 2019: discussions between Sharad Pawar-Sonia Gandhi are incomplete!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.