हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:15 IST2025-10-03T14:15:09+5:302025-10-03T14:15:47+5:30
एका लहान मुलाने आई आणि बहिणीने त्याला मारल्यानंतर थेट डायल ११२ वर कॉल केला.

हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
मध्य प्रदेशातील सिंगरौलीमध्ये माणुसकी आणि संवेदनशीलतेचा एक हृदयस्पर्शी प्रकार समोर आला आहे. खुटर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चितरवई कला गावात एका लहान मुलाने त्याच्या आई आणि बहिणीने त्याला मारल्यानंतर थेट डायल ११२ वर कॉल केला. पोलिसांना फोन करून त्याने आपल्या आईची तक्रार केली. मुलाच्या तक्रारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लहान मुलगा कुरकुरेसाठी २० रुपये मागत होता. याच कारणावरून त्याची आई आणि बहिणीने त्याला दोरीने बांधलं आणि मारहाण केली. रडत असलेल्या मुलाने डायल ११२ वर पोलिसांना फोन केला. त्याने सांगितले की, त्याची आई आणि बहिणीने त्याला मारलं. हे ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाचं सर्वात आधी हळूवारपणे सांत्वन केलं आणि लवकरच घटनास्थळी पोहोचण्याचं आश्वासन दिलं.
डायल ११२ वर तैनात असलेले पोलीस अधिकारी उमेश विश्वकर्मा ताबडतोब गावात पोहोचले. त्यांनी मुलाला आणि त्याच्या आईला फोन करून त्यांचं समुपदेशन केलं. पोलिसांनी आईला सूचना दिल्या की, भविष्यात मुलाला मारहाण करू नये आणि त्याला प्रेमाने गोष्टी समजावून सांगाव्यात. तसेच लहान मुलाला कुरकुरे देऊन त्याला खूश देखील केलं.
मुलाच्या निष्पाप तक्रारीचा आणि पोलिसांच्या संवेदनशील दृष्टिकोनाने हे प्रकरण हाताळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर लोक पोलिसांचं भरभरून कौतुक करत आहेत. पोलीस अनेकदा त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात, परंतु या घटनेने त्यांची माणुसकी समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.