Lumpy Skin Disease: कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:29 IST2022-07-25T13:27:23+5:302022-07-25T13:29:39+5:30
Lumpy Skin Disease in Gujarat: देशात कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका वाढत असतानाच एका एका नवीन विषाणूची एंट्री झाली आहे. जनावरामध्ये या धोकादायक विषाणूची लागण झपाट्याने होत आहे.

Lumpy Skin Disease: कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू
Lumpy Skin Disease in Gujarat: सध्या देशात कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्सचा धोका वाढला आहे. यातच आता गुजरातमध्ये एका नवीन विषाणूचे संकट आले आहे. हा नवीन विषाणू सध्यातरी जनावरांमध्ये झपाट्याने वाढत आहे. गुजरातचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितल्यानुसार, या नवीन विषाणूमुळे राज्यात आतापर्यंत 999 गुरांचा मृत्यू झाला आहे, यापैकी बहुतांश गायी आणि म्हशी आहेत.
14 जिल्ह्यांमध्ये पसरला व्हायरस
गुजरात सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितले की, राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 'लम्पी स्किन डिसीज'चा प्रसार झाला आहे. आतापर्यंत हजारो जनावरांमध्ये हा रोग आढळून आला असून, 999 जनावरे दगावली आहेत. तसेच, 37 हजारांहून अधिक संक्रमित जनावरांवर उपचार सुरू आहेत.
पहिली केस कधी आढळली
गुजरात सरकारचे मंत्री राघवजी पटेल म्हणाले की, राज्यात या आजाराचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या आजारावर नियंत्रण मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले. पण, या आजाराचे पहिले प्रकरण नेमके कुठे आढळले, याची ठोस माहिती मिळू शकली नाही.
हा रोग जनावरांमध्ये कसा पसरतो
लम्पी स्किन डिसीज हा एक रोग आहे जो डास, माश्या, उवा आणि कचऱ्यामुळे पसरतो. गुरांच्या थेट संपर्कात येऊन किंवा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे त्याचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे म्हणजे, ताप येणे, डोळे व नाकातून स्त्राव होणे, तोंडातून लाळ गळणे, संपूर्ण शरीरावर गुठळ्यांसारखे मऊ फोड येणे, दुधाचे उत्पादन कमी होणे आणि आहार घेण्यात त्रास होणे, यांचा समावेश होतो.