Lucknow Crime :उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० डिसेंबर रोजी लखनऊच्या मदे गंजमध्ये मोहम्मद रिझवान नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल १३ दिवसांनंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत प्रेमप्रकरणाचा संदर्भ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी देऊन रिक्षा चालक मोहम्मद रिझवानची हत्या करण्यात आली. मात्र हल्लेखोरांना मोहम्मद रिझवानची नव्हे तर मोहम्मद इरफानच्या हत्येची सुपारी मिळाली होती. मात्र ओळखण्यात झालेल्या चुकीमुळे रिझवानची हत्या झाली. या प्रकरणात सुपारी देणारा वकील आणि हल्लेखोर यासीर आणि कृष्णकांत या कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी, वकील आफताब अहमद याने प्रेमिकेच्या वडिलांना आणि पतीला मारण्यासाठी यासीर आणि कृष्णकांतला सुपारी दिली होती. मात्र, चुकून मारेकऱ्यांनी लक्ष्य केलेल्या इरफानच्याऐवजी मोहम्मद रिझवानवर गोळ्या झाडल्या. भिकमपूर येथील रहिवासी मोहम्मद रिझवान हा ऑटो चालवायचा. ३० डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास रिझवान खडरा मक्कागंज येथे गेला होता. तिथेच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनास्थळी आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता त्यामध्ये दोन संशयित तरुण दिसून आले.
बाईकच्या नंबरवरुन पोलीस कृष्णकांत उर्फ साजन याच्यापर्यंत पोहोचून त्याला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर यासीरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडे चौकशी केली असता खून प्रकरणात दोघांचा संबंध असल्याचे समोर आलं. प्रेयसीच्या वडिलांना काही झाले तर ती दिल्लीहून लखनऊला येईल, हे आफताबला माहीत होते. त्यामुळे आफताबने प्रेयसीच्या वडिलांच्या हत्येचा कट रचला. २९ डिसेंबर रोजी कृष्णकांत आणि यासीर यांनी दुचाकीवरून मुलीच्या वडिलांच्या घराची रेकी केली. यासीरने कृष्णकांतला घर दाखवले. दरम्यान, रात्री ११.४५ च्या सुमारास ऑटोचालक रिझवान हा मुलीच्या वडिलांच्या घराजवळून जात होता. कृष्णकांत याने ऑटोचालक रिझवानला फसवून त्याच्या मानेवर गोळी झाडली आणि दोघेही तेथून पळून गेले.
वकील आफताब अहमद यांचे खडरा येथे राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. रेल्वेतून निवृत्त झालेल्या तिच्या वडिलांनी २०२३ मध्ये मुलीचे लग्न दिल्लीत राहणाऱ्या सरकारी शिक्षकाशी केले होते. लग्नानंतरही मुलगी आफताबशी बोलायची. तिच्या पतीने आफताब आणि तरुणीमधील व्हॉट्सॲप चॅटिंग वाचले होते. पतीच्या दबावामुळे मुलीने आफताबशी बोलणे बंद केले. आफताबने खूप प्रयत्न केले, पण तो त्याच्या प्रेयसीशी संपर्क साधू शकला नाही. यावर त्याने प्रेयसीच्या वडिलांच्या हत्येचा कट रचला. आफताबने कॉन्ट्रॅक्ट किलर कृष्णकांत आणि यासीर यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपयांमध्ये मारण्याची सुपारी दिली होती.
मुलीचे वडील असल्याच्या संशयावरून कृष्णकांत आणि यासीरने ऑटोचालक रिझवानची हत्या केली होती. हा प्रकार आफताबला कळला. यानंतर कृष्णकांत आणि यासीर यांनी सुपारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी सुरू केली. मात्र ऑटोचालकाची हत्या केल्यानंतर आफताबने सुपारीची रक्कम देण्यास नकार दिला. सुपारीचे पैसे न देण्यावरून सुपारी व आफताब यांच्यात वाद देखील झाला होता.