Mallikarjun Kharge : "ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा..."; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:33 IST2024-01-30T15:10:14+5:302024-01-30T15:33:41+5:30
Congress Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि आरएसएसपासून दूर राहण्याचं आवाहन केलं.

Mallikarjun Kharge : "ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा..."; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा
लोकसभा निवडणुकीबाबत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. याच दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी अशी एक शंका व्यक्त केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका लोकांसाठी लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी असेल कारण भाजपाने आगामी निवडणुका जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाही करू शकतात असं म्हणत खरगे यांनी भाजपा आणि आरएसएसपासून दूर राहण्याचं आवाहन केलं.
काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी पक्षाच्या रॅलीला संबोधित करताना सांगितलं की, "भारतातील लोकशाही वाचवण्याची ही जनतेसाठी शेवटची संधी असेल. नरेंद्र मोदींनी दुसरी निवडणूक जिंकल्यास देशात हुकूमशाही येईल. रशियातील पुतीनसारखी भाजपा भारतावर राज्य करेल." भाजपा आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवत खरगे म्हणाले की, "सध्याचं मोदी सरकार विरोधी नेत्यांना धमकावून हे सर्व चालवत आहेत."
"राजकारण्यांना नोटिसा पाठवल्या जात असून ईडी आणि आयकर विभाग हे राजकीय विरोधकांना चिरडण्याचे हत्यार बनलं आहे. लोकांना भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीची माहिती व्हावी. नेत्यांनी भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीला विरोध केल्यास पक्ष आणि आघाडी सोडण्याची धमकी दिली जाते" असा आरोप काँग्रेस अध्यक्षांनी केला.
राहुल गांधी यांचा भाजपा आणि आरएसएसचा विरोध असल्याने त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जातो, असा दावा खरगे यांनी केला. "राहुल गांधी त्यांच्या दबावाला बळी पडले नाहीत आणि देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या शक्तींविरुद्ध लढत राहिले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भारतीय जनता पक्षाशी संबंध आल्याने आगामी निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही. महाआघाडीतून एका व्यक्तीच्या जाण्याने आम्ही कमकुवत होणार नाही. आम्ही भाजपाचा पराभव करू" असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.