पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 09:51 IST2019-04-18T08:46:18+5:302019-04-18T09:51:37+5:30

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले.

Lok Sabha Polls 2019: Officer Checks PM Modi’s Chopper In Odisha, Suspended | पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित

भुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती. 


निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे पालन केले नाही. यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. 

मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांचे निलंबन झाल्याचे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.


या तपासणीमुळे पंतप्रधानांना या ठिकाणी 15 मिनिटे थांबावे लागले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते. 




मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला?
दरम्यान,  मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून कथितरीत्या एक काळा बॉक्स नेण्यात आला होता. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली. त्यांनी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,'' आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक गुढ बॉक्स बाहेर काढण्यात आला. तसेच धाईगडबडीत इनोव्हामध्ये टाकून नेण्यात आला. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन या बॉक्समध्ये काय होते आणि इनोव्हा कुणाची होती. याची चौकशी केली पाहिजे.'' 

Web Title: Lok Sabha Polls 2019: Officer Checks PM Modi’s Chopper In Odisha, Suspended